हिंदुस्थानी शास्त्रीय संगीत व वाद्यांची मिळणार माहिती
- सोलापूर : प्रिसिजन फाऊंडेशनच्या वतीने रविवार दि. २ फेब्रुवारी २०२० रोजी ‘ट्यून इन’ हा शास्त्रीय संगीताविषयी माहिती देणारा कार्यक्रम आयोजिण्यात आला आहे. पुणे येथील बैठक फाऊंडेशनच्या सहकार्याने आयोजित हा कार्यक्रम अँफी थिएटर येथे सकाळी १०.२५ वाजता होईल. या कार्यक्रमात पहिल्या सत्रात हिंदुस्थानी शास्त्रीय संगीताचा मूलाधार असलेल्या स्वर, त्याचे नोट्स आणि रागदारी म्हणजे काय, यावर भर दिला जाईल. त्यानंतर तानपुरासह बाकीच्या साथसंगतीच्या वाद्यांचा परिचय करून दिला जाईल.
पुढच्या सत्रात संगीत मैफिलीचं स्वरूप काय असतं, विलंबित ख्याल, आलाप-जोड-झाला म्हणजे काय? वाद्य संगीताच्या बाबतीत मध्य लय, द्रुत लय म्हणजे काय? याची माहिती दिली जाईल. त्यानंतरच्या ४० मिनिटात एखादा राग सादर केला जाणार असून उदाहरणासह स्पष्टीकरण दिले जाईल.
शास्त्रीय संगीताचा मानवी मनाशी असणारा संबंध, मैफिलीचं स्वरूप याबाबतही या कार्यक्रमात माहिती मिळणार आहे. शास्त्रीय संगीताची आस्वादकता वाढावी या उद्देशानेच हा कार्यक्रम आयोजिण्यात आला आहे. बैठक फाऊंडेशनचे दाक्षायणी आठल्ये व मंदार करंजकर हे सादरीकरण करतील.