सोलापूर : प्रिसिजन कॅमशाफ्ट्स लिमिटेड कंपनीत ४९ वा ‘राष्ट्रीय सुरक्षा सप्ताह’ उत्साहात पार पडला. सुरक्षा सप्ताहानिमित्त सर्व कामगार व कर्मचार्यांनी सुरक्षा शपथ घेतली.
भारतात प्रतिवर्षी ४ ते १० मार्च या कालावधीत राष्ट्रीय सुरक्षा सप्ताह साजरा केला जातो. ‘प्रगत तंत्रज्ञानाच्या सहाय्याने सुरक्षा आणि आरोग्याची कार्यक्षमता वाढवा’ ही यंदाच्या राष्ट्रीय सुरक्षा सप्ताहाची थीम होती. त्यानिमित्त प्रिसिजनच्या अक्कलकोट रोड एमआयडीसी व चिंचोळी एमआयडीसीतील प्रकल्पात विविध स्पर्धा झाल्या. सुरक्षा घोषवाक्य, सुरक्षा पोस्टर, सुरक्षा कविता, सुरक्षा प्रश्नमंजूषा आदी स्पर्धांमध्ये कर्मचारी व कामगारांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला. रस्ता सुरक्षा, उंचावर काम करताना घ्यावयाची काळजी, फोर्कलिफ्टचा वापर, आरोग्य व पर्यावरण, प्लॅस्टिकचा वापर, वैयक्तिक सुरक्षा साधनांचे महत्व यांबाबत सर्वांना माहिती देण्यात आली.
सेफ्टी ऑफिसर सुहास पाटील यांनी सर्वांना सुरक्षेची शपथ दिली. तसेच आग विझविण्यासाठी फायर एक्स्टिंग्विशरचा उपयोग कसा करावा हे सांगण्यात आले. कामगार व कर्मचार्यांच्या माहितीसाठी सुरक्षा साधनांचे प्रदर्शनही भरविण्यात आले होते. तसेच आपत्कालीन परिस्थिती कशी हाताळावी हे समजावून सांगण्यासाठी मॉक ड्रिलही घेण्यात आले.