सोलापूर : प्रिसिजन फाउंडेशन व सेवावर्धिनी (पुणे) यांच्या संयुक्त विद्यमाने सामाजिक संस्थांसाठी आयोजित ‘आरंभ…नव्या प्रेरणांचा!’ ही कार्यशाळा उत्साहात पार पडली. एकमेकांच्या साथीने सोलापूरचा नियोजनपूर्वक कायापालट करण्याचा निर्धार करण्यात आला. प्रिसिजन फाउंडेशनच्या या उपक्रमातून माध्यमातून सामाजिक संस्थांच्या सक्षमीकरणाचा आरंभ झाला.
सोलापूर-पुणे मार्गावरील केगांव येथील सिंहगड इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये दि. २२ व २३ फेब्रुवारी रोजी ही निवासी कार्यशाळा झाली. या कार्यशाळेत शहरजिल्ह्यातून विविध क्षेत्रात काम करणाऱ्या ६७ संस्थांचे १२५ प्रतिनिधी सहभागी झाले होते.
दि. २२ फेब्रुवारी रोजी सकाळी ९.२५ वाजता प्रिसिजन फाऊंडेशनच्या अध्यक्षा डॉ. सुहासिनी शहा यांच्या हस्ते कार्यशाळेचे उदघाटन झाले. संस्थेचे व्हिजन-मिशन-उद्दिष्ट, कार्यालयीन व हिशोब व्यवस्थापन, संस्था नोंदणी कायदा व नियम, प्रकल्प निवड तसेच त्याची तयारी, व्यवस्थापन व अंमलबजावणी अशा विविध महत्वाच्या विषयांबद्दल उपस्थितांना माहिती देण्यात आली. माणिक दामले, श्रीराम पटवर्धन, ऍड. नितीन हबीब, डॉ. प्रसाद देवधर आदी मान्यवरांनी मार्गदर्शन केले. प्रिसिजनचे जनसंपर्क अधिकारी माधव देशपांडे यांनी डॉ. दिवाकर कुलकर्णी यांची प्रकट मुलाखत घेतली. कार्यशाळेच्या समारोपाच्यावेळी सहभागी कार्यकर्त्यांनी अभिप्रायही दिले. उदघाटनानंतर झालेल्या मुक्त सत्रात खेळाच्या माध्यमातून मनोरंजक पद्धतीने सर्व सामाजिक कार्यकर्त्यांची ओळख झाली. यामुळे सर्वांमध्ये एक ऋणानुबंध निर्माण झाल्याचे चित्र दिसले. आगामी काळात या गोष्टीचा सकारात्मक परिणाम सोलापूर जिल्ह्यातील सामाजिक क्षेत्रात दिसणार आहे.
- सेवावर्धिनी, सिंहगड इन्स्टिट्यूट, चंदेले कॉलेजचे सहकार्य
या कार्यशाळेसाठी सेवावर्धिनीचे सीईओ प्रमोद कुलकर्णी यांच्यासोबत सोमदत्त पटवर्धन, श्रीराम पटवर्धन, कुलदीप पुरंदरे, गिरीजा शिरसीकर, नेहा क्षीरसागर, दीपक आफळे, हर्षन पाटील आदींनी परिश्रम घेतले. सिंहगड इन्स्टिट्यूटचे संजय नवले व डॉ. शंकर नवले यांनी सहकार्य केले. चंदेले कॉलेजच्या सामाजिक कार्य विभागाच्या विद्यार्थ्यांनी प्रा. बाळासाहेब भास्कर यांच्या मार्गदर्शनाखाली स्वयंसेवक म्हणून योगदान दिले.