सोलापूर :- दि. 22 – सोलापूर जिल्ह्याचा विकास गतीने होण्यासाठी सर्व विभागांनी समन्वयाने आराखडा तयार करावा. त्या आराखड्यांची अंमलबजावणी करावी आणि विकासाची प्रलंबित कामे पुर्ण करण्यासाठी पाठपुरावा करावा असे आवाहन पालकमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी आज येथे केले.
पालकमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली आज आढावा बैठक झाली. जिल्हाधिकारी कार्यालयातील बहुउद्देशीय सभागृहात झालेल्या बैठकीत जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर , पोलीस आयुक्त अंकुश शिंदे, महापालिका आयुक्त दीपक तावरे, पोलीस अधीक्षक मनोज पाटील, अतिरिक्त मुख्यकार्यकारी अधिकारी अर्जुन गुंडे, निवासी उपजिल्हाधिकारी अजित देशमुख आदी उपस्थित होते.
पालकमंत्री दिलीप-वळसे पाटील यांनी सांगितले जिल्ह्यात अनेक विकास प्रकल्प प्रलंबित आहेत. काही प्रकल्प निधी अभावी तर काही प्रकल्प प्रशासकीय अडचणी अभावी प्रलंबित आहेत. निधी उपलब्ध करुन देण्याचा विषय राज्यस्तरावरुन सोडविण्यात येईल मात्र, प्रशासकीय अडथळा दुर करण्यासाठी विविध विभागांनी समन्वयाने काम करण्याची आवश्यकता आहे. त्यासाठी जिल्हाधिकारी शंभरकर यांनी पुढाकार घ्यावा.
आषाढी आणि कार्तिकी वारीला बंदोबस्तासाठी येणाऱ्या पोलिसांची राहण्याची व्यवस्था करण्यासाठी प्रस्ताव द्यावा, अशा सूचना पालकमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी दिल्या. पंढरपूर तीर्थक्षेत्र विकास आराखड्याच्या माध्यमातून पोलिसांच्या राहण्याची व्यवस्था केली जाण्यासाठी उपाययोजना करण्याची मागणी पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी केली.त्यावर पालकमंत्री वळसे-पाटील यांनी जिल्हाधिकारी शंभरकर यांना वरील सूचना केली. शहरातील एमआयडीसी साठी नवीन पोलीस स्टेशन निर्मितीसाठी प्रस्ताव पाठवण्यात यावा, असे पालकमंत्री वळसे-पाटील यांनी सांगितले. पोलीस अधिकारी आणि कर्मचारी यांच्या निवासाची व्यवस्था करण्यासाठी नवीन प्रकल्प उभारण्यासाठी गृहनिर्माण विभागाकडे पाठपुरावा करण्याच्या सूचनाही वळसे-पाटील यांनी केल्या.
सोलापूर महानगरपालिकेचे विविध प्रकल्प वेळेत पुर्ण करावेत स्मार्ट सिटी प्रकल्पातील कामे दर्जेदार करावीत. महानगरपालिकच्या शाळांचा दर्जा सुधारण्यासाठी शिक्षणाधिकारी यांनी नवी दिल्ली येथील शाळांचे कामकाज पाहून यावे अशा सूचना पालकमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी केल्या.
नवीन सिंचन योजना तयार करताना सोलापूर शहराच्या पाण्याचे आरक्षण ठेवले जावे. शहराला लागणाऱ्या पाण्यात कोणत्याही प्रकारची कपात करु नये अशा सूचना पालकमत्र्यांनी जलसंपदा विभागाला दिल्या.जिल्हा परिषदेच्या कामकाजात सुसूत्रता आणावी. आवश्यक नसणाऱ्या योजना राबविल्या जावू नयेत असे त्यांनी सांगितले.
यावेळी जलसंपदा विभागाचे अधिक्ष्क अभियंता जयंत शिंदे, धीरज साळे, जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी बसवराज बिराजदार, जिल्हा उपनिबंधक कुंदन भोळे, वस्त्रोद्योग विभागाचे किरण सोनवणे आदींनी सादरीकरण केले.