येस न्युज मराठी नेटवर्क : राजकीय क्षेत्रात प्रणवदा या नावाने परिचित असलेले प्रणव मुखर्जी यांचा जन्म ११ डिसेंबर १९३५ ला बंगाल्या वीरभूम जिल्ह्यातील मिरती गावात झाला. त्यांचे वडील कामदा किंकर मुखर्जी हे स्वातंत्र्य सैनिक होते. तसेच ते बंगाल विधानसभेचे सदस्य देखील होते. प्रणवदांनी कोलकाता विद्यापीठातून कायद्याची पदवी प्राप्त केली आहे.
प्रणवदांनी आपल्या करिअरची सुरुवात पोस्ट अॅण्ड टेलिग्राफ ऑफिसमधून केली. ते क्लार्क होते. त्यानंतर ते सन १९६३ मध्ये विद्यानदर कॉलेजात राज्यशास्त्राचे प्राध्यापक बनले. त्यांनी पत्रकार म्हणूनही काही काळ काम केले . त्यानंतर सन १९६९ मध्ये ते काँग्रेसच्या तिकिटावर राज्यसभेचे सदस्य बनले आणि येथूनच त्यांची राजकीय कारकिर्द सुरू झाली.
थोड्याच काळात ते इंदिरा गांधी यांचे चाहते बनले. १९७३ मध्ये ते इंदिरा गांधी यांच्या कार्यकालात औद्योगिक विकास मंत्रालयाचे उपमंत्री बनले. राजीव गांधी यांच्याशी मात्र त्यांचे संबंध तितकेसे चांगले नव्हते. राजीव गांधी यांच्या मंत्रिमंडळात ते अर्थमंत्री होते.
राजीव गांधी यांच्याशी त्यांचे न पटल्याने त्यांनी राष्ट्रीय समाजवादी काँग्रेसची स्थापना केली. मात्र पुढे ते पुन्हा काँग्रेसमध्ये आले. इंदिरा गांधी यांच्यानंतर आपण पंतप्रधान बनावे हे प्रणवदांचे स्वप्न होते. मात्र, इंदिरा गांधी यांच्या मृत्यूनंतर राजीव गांधी पंतप्रधान बनले. पुढे पी. व्ही. नरसिंह राव यांनी प्रणवदांना मोठे सहकार्य केले. नरसिंह राव पंतप्रधान बनल्यानंतर त्यांनी प्रणवदांकडे योजना आयोगाचे अध्यक्षपद सोपवले. त्यानंतर त्यांना केंद्रीय कॅबिनेट मंत्री आणि परराष्ट्र मंत्रालयाची जबाबदारी देण्यात आली.