मुंबई, दि. 22 :- कोरोनाविरुद्धच्या लढाईत प्रत्यक्ष युद्धभूमीवर उतरुन लढणाऱ्या डॉक्टर, नर्सेस, पॅरॉमेडिकल स्टाफ, सफाई कर्मचारी, पोलिस, पत्रकार, शासकीय व स्वयंसेवी यंत्रणेतील व्यक्ती देखील कोरोनाग्रस्त होत असल्याबद्दल उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी चिंता व्यक्त केली आहे. कोरोनाविरुद्धची लढाई जिंकण्यासाठी ही मंडळी सुरक्षित राहिली पाहिजेत, त्यासाठी या सर्वांनी आपली कर्तव्ये पार पाडताना वैयक्तिक सुरक्षिततेचीही काळजी घ्यावी, असं आवाहन उपमुख्यमंत्र्यांनी केलं आहे.
राज्यातील कोरोनाग्रस्तांची वाढती संख्या चिंताजनक असून अजूनही काहींना परिस्थितीचे गांभीर्य कळलेले नाही, हे दुर्दैवं आहे. नागरिक विनाकारण रस्त्यावर येत असल्याने कोरोनाचा संसर्ग वाढत आहे. टाळेबंदीच्या यशाला मर्यादा पडत आहेत. पोलिस, डॉक्टर, शासकीय यंत्रणेवरचा ताण वाढत आहे. त्यासाठी नागरिकांनी आपापल्या घरातंच थांबण्याचं आवाहन उपमुख्यमंत्र्यांनी केलं आहे.
नागरिकांनी घरातंच थांबून सहकार्य केल्यास कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लवकर रोखता येईल, असं उपमुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे. डॉक्टर, नर्सेस, पॅरॉमेडिकल स्टाफ, सफाई कर्मचारी, पोलिस, पत्रकार, शासकीय व स्वयंसेवी यंत्रणेतील व्यक्ती जोखीम पत्करुन कोरोनाची लढाई लढत आहेत. त्यांचे उपमुख्यमंत्र्यांनी आभार मानले आहेत. कर्तव्य बजावताना या सर्वांनी स्वत:च्या आणि कुटुंबाच्या आरोग्याचीही काळजी घ्यावी, संबंधीत यंत्रणांच्या प्रमुखांनीही यादृष्टीने आवश्यक उपाययोजना कराव्यात, असं आवाहनही उपमुख्यमंत्र्यांनी केलं आहे.
000000