सोलापूर- पुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाचा प्रथम नामविस्तार दिनाचा सोहळा शुक्रवारी साजरा करण्यात येणार असून यानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आल्याची माहिती कुलसचिव डॉ. विकास घुटे यांनी दिली.
शुक्रवारी सकाळी साडे अकरा वाजता विद्यापीठाच्या मुख्य सभागृहात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेचे पूजन व अभिवादनाचा कार्यक्रम होणार आहे. कुलगुरू डॉ. मृणालिनी फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी बीडचे ज्येष्ठ पत्रकार तथा संशोधक रामभाऊ लांडे यांच्या विशेष व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे. ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे जीवनकार्य’ हा त्यांच्या व्याख्यानाचा विषय आहे. लांडे यांचे अहिल्यादेवी होळकर यांच्या जीवन कार्यावर दोन पुस्तके प्रकाशित झाली आहेत. यावेळी प्रभारी प्र-कुलगुरू डॉ. विकास कदम यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.
दुपारच्या सत्रात तीन वाजता डॉ. विठ्ठल धडके यांचे ‘कोरोना व्हायरस आजार’ या विषयावर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमांचा विद्यार्थी, शिक्षक, कर्मचारी व नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन भाषा संकुलाचे प्रभारी संचालक डॉ. प्रभाकर कोळेकर यांनी केले आहे.