पुणे, दि.४: सध्याच्या लॉक डाऊन परिस्थितीत स्थलांतर केलेल्या मजुरांसाठी पुणे विभागात 671 रिलीफ कॅम्प उभारण्यात आले आहेत. यातील जिल्हा प्रशासनामार्फत 109 कॅम्प तर साखर कारखान्यांमार्फत 562 कॅम्प उभारले आहेत. या कॅम्पमध्ये 62 हजार 736 स्थलांतरित मजूर असून 1 लाख 17 हजार 16 मजुरांना भोजन देण्यात येत आहे, अशी माहिती विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी दिली.
पुणे विभागातील गरजू तसेच रोजंदारीवर असलेल्या नागरिकांना सामाजिक संस्था, सेवाभावी संस्थांकडून तसेच दानशूर व्यक्तींकडून दहा जीवनावश्यक वस्तूंच्या किटचे वाटप करण्यासाठी यंत्रणा उभारण्याच्या सूचना डॉ. म्हैसेकर यांनी विभागातील सर्व जिल्हाधिकारी व महानगरपालिका आयुक्त यांना दिल्या आहेत. या किटमध्ये गव्हाचे पिठ व तांदूळ प्रत्येकी पाच किलो, डाळ, तेल, साखर, मीठ प्रत्येकी 1 किलो, हळद 100 ग्रॅम, तिखट 250 ग्रॅम, अंगाचा साबण व कपड्याचा साबण प्रत्येकी 1 वडी या 10 वस्तूंचा समावेश या किटमध्ये करण्यात आला आहे, अशी माहिती डॉ. म्हैसेकर यांनी दिली.