दिल्ली : निर्भया बलात्कार आणि हत्या प्रकरणात आरोपी पवन कुमारची याचिका फेटाळण्यात आली आहे. त्यामुळे आता चारही आरोपींचा फाशीचा मार्ग मोकळा झाला आहे. ३ मार्च २०२० ला या चारही जणांना फाशी देण्यासंबंधीचं डेथ वॉरंट याआधीच जारी करण्यात आलं आहे. आता पवनने राष्ट्रपतींकडे दयेचा अर्ज केला आहे. खरंतर या चारही आरोपींपुढचे सगळे कायदेशीर पर्याय संपल्यात जमा आहेत. तरीही पवन आणि अक्षय या दोघांनी अनुक्रमे शुक्रवारी आणि शनिवारी याचिका दाखल केली होती. त्यातील पवनची याचिका फेटाळण्यात आली आहे.
निर्भया प्रकरण आहे काय?
दिल्लीत डिसेंबर २०१२ मध्ये महाविद्यालयीन विद्यार्थिनी असलेली निर्भया ही तिच्या मित्रासोबत सिनेमा पाहून घरी परतत होती. नवी दिल्ली येथील मुनीरकापासून द्वारका या ठिकाणी जाण्यासाठी या दोघांनी बस पकडली. या बसमध्ये बसल्यावर फक्त पाच ते सात प्रवासी असल्याचं या दोघांना लक्षात आलं. प्रवास सुरु झाल्यानंतर बसलेल्या इतरांनी निर्भयासोबत छेडछाड केली. यामध्ये तिच्या मित्राने हस्तक्षेप केला तेव्हा त्याला बेशुद्ध होईपर्यंत मारहारण करण्यात आली. यानंतर सहा आरोपींनी निर्भयावर सामूहिक बलात्कार केला. एवढंच नाही तिचा अमानुषपणे लैंगिक छळही केला. यानंतर विविस्त्र अवस्थेत निर्भया आणि तिच्या मित्राला बसबाहेर फेकून देण्यात आलं.