मुंबई : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आज अयोध्या दौऱ्यावर आहेत. अयोध्येत ते प्रभू रामचंद्रांचे दर्शन घेणार आहेत. उद्धव ठाकरे यांच्यासमवेत शिवसेनेचे नेतेही अयोध्येत पोहोचले आहेत. जळगावचे शिवसेनेचे नेते गुलाबराव पाटील यांनी हिंदुत्वाच्या विषयावर बोलताना भाजपाचे खासदार नारायण राणे यांच्यावर अत्यंत बोचरी टीका केली.
“उद्धव ठाकरे यापूर्वी अयोध्येत आले होते. त्यावेळी पहिले मंदिर नंतर सरकार असे ते म्हणाले होते. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे आता राम मंदिर बांधण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. सरकारला शंभर दिवस पूर्ण झाल्यानंतर दर्शनासाठी येईन असे ते म्हणाले होते. त्यानुसार आज ते अयोध्येत आले आहेत” असे गुलाबराव पाटील म्हणाले.
हे सरकार शंभर तास चालणार नाही असे भाजपाचे नेते म्हणाले होते. पण आज शंभर दिवस पूर्ण झाले आहेत, त्या प्रश्नावर गुलाबराव पाटील म्हणाले की, “मागे नारायण राणे म्हणाले होते. गणपती बुडण्याआधी शिवसेना बुडवीन. अकरा दिवस पण सरकार टिकणार नाही. हे नारायण राणे आम्हाला काय शिकवणार ? ते भाजपाचे बकरे बनले आहेत” अशी टीका त्यांनी केली. शंभर दिवसच नाही हे सरकार पाचवर्ष टिकेल असा दावा गुलाबराव पाटील यांनी केला.