सोलापूर दि.5 :- सोलापुरात कोरोनाचा संशयित रुग्ण नसून नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये असे, आवाहन जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी आज केले.कोरोना विषाणुच्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी आज सर्व संबंधितांची बैठक घेतली त्यानंतर त्यांनी हे आवाहन केले.
जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांच्या दालनात झालेल्या बैठकीत महानगरपालिका आयुक्त दीपक तावरे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रकाश वायचळ, निवासी उपजिल्हाधिकारी अजित देशमुख, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. भिमाशंकर जमादार, महानगरपालिकेचे आरोग्य अधिकारी डॉ. संतोष नवले, अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. मोहन शेगार, नगर प्रशासन अधिकारी पंकज जावळे आदी उपस्थित होते.
बैठकीपूर्वी जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी जिल्ह्यातील आरोग्य विभागाच्या तयारीबाबत व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे मुख्य सचिव अजोय मेहता आणि सार्वजनिक आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ. प्रदीपकुमार व्यास यांना सविस्तर माहिती दिली. त्यानंतर त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालय ( सिव्हिल हॉस्पिटल) येथे भेट देऊन विशेष कक्षाची पहाणी केली.
दरम्यान अश्विनी रुग्णालयातील रुग्ण न्युमोनिया आजाराने ग्रस्त असल्याचे स्पष्ट असून त्यांना उपचारासाठी त्यांच्या नातेवाईकांनी पुणे येथील दीनानाथ मंगेशकर रुग्णालय येथे हलवले आहे, असेही श्री. शंभरकर यांनी सांगितले.
अश्विनी रुग्णालयाचे डॉ. सत्यशेखर पाटील, डॉ. निर्मलकुमार तापडीया, डॉ. ज्योती चेडगुपकर, डॉ. उज्वला लोखंडे यांनी रुग्णाबाबत जिल्हाधिकारी शंभरकर यांना माहिती दिली. शंभरकर यांनी त्यांच्याकडून सविस्तर माहिती घेऊन रुग्णांच्या संपर्कात राहावे, त्यांना आवश्यक सुविधा मिळतील, याबाबत दक्षता घ्यावी, अशा सूचना दिल्या.