आशिया खंडातील सर्वात मोठी झोपडपट्टी असलेल्या धारावीत करोनाचा फैलाव वाढू लागल्यामुळे मुंबईकरांच्या चिंतेत वाढ झाली आहे. धारावीतील करोना रुग्णांचा आकडा दररोज वाढतोच आहे. रविवारी या झोपडपट्टीतील करोना रुग्णांची संख्या १५ ने वाढली आहे. आतापर्यंत या झोपडपट्टीत एकूण ४३ रुग्ण पॉझिटिव्ह आढळले असून, ४ जणांचा मृत्यू झाला आहे. धारावीसह दादरमधीलही रूग्णांची संख्या दिवसागणिक वाढत आहे. आज, दादरमध्ये दोन नवे रूग्ण आढळले आहेत. त्यामुळे दादरमधील करोना रुग्णांची संख्या तेरा वर पोहोचली आहे. धारावी आणि दादरमधील करोनाच्या रूग्णांची संख्या दिवसागणिक वाढतच असल्यामुळे आरोग्य यंत्रणेसमोरचं टेन्शन वाढलं तर मुंबईकरांच्या चिंतेत वाढ झाली आहे.
धारावीतील नव्या १५ करोना रूग्णांपैकी नऊ रूग्णांवर राजीव गांधी क्वॉरंटाइन केंद्रात उपचार सुरू आहेत. हे नऊ रुग्ण धारावीतील सोशल नगरमध्ये मृत्यू पावलेल्या मृत व्यक्तीच्या आणि मदिना नगरमधील करोनाबाधित व्यक्तीच्या संपर्कात आले होते. इतर सहा नव्या करोना रुग्णांपैकी चारजण हे सोशल नगरजवळच्या शास्त्रीनगर येथील आहेत. तर दोनजण जनता हौसिंग सोसायटीमधील आहेत.