विद्यापीठाच्या उद्योजकता प्रदर्शनात आमदार देशमुख यांचे आवाहन
सोलापूर- कोणतीही गोष्ट करण्यासाठी धाडस लागते. या धाडसाच्या बळावरच युवक-युवतींनी नोकरीसाठी पुणे-मुंबईला न जाता व्यवसायाकडे वळून उद्योग उभारावे. उद्योगाच्या माध्यमातून सोलापूर जिल्ह्याची उत्पादकता वाढविण्याबरोबरच वैभव वाढवण्याचे कार्य करावे, असे आवाहन माजी सहकारमंत्री तथा आमदार सुभाष देशमुख यांनी केले.
शनिवारी, संगमेश्वर कॉलेजच्या मैदानावर पुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्यावतीने आयोजित उद्योजकता शिबिर व प्रदर्शनाचे उद्घाटन आमदार देशमुख यांच्या हस्ते झाले. यावेळी ते बोलत होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कुलगुरू डॉ. मृणालिनी फडणवीस या होत्या. याप्रसंगी संगमेश्वर एज्युकेशन सोसायटीचे सचिव धर्मराज काडादी, इनक्युबेशन सेंटर मुंबईचे उमेश बलवाणी, प्रभारी प्र-कुलगुरू डॉ. विकास कदम, कुलसचिव डॉ. विकास घुटे, वित्त व लेखाधिकारी श्रेणिक शहा, संगमेश्वर कॉलेजच्या प्राचार्या डॉ. शोभा राजमान्य, विद्यापीठातील इनक्युबेशन सेंटरचे डॉ. अजित माणिकशेटे यांची प्रमुख उपस्थिती होती. प्रारंभी डॉ. रश्मी दातार यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक व स्वागत केले. या प्रदर्शनात एकूण 50 नव उद्योजकांनी स्टॉल मांडल्याचे त्यांनी सांगितले.
आमदार देशमुख म्हणाले की, उद्योग व व्यवसाय सुरू करण्यासंदर्भात मुली व महिलांची भूमिकाही महत्त्वाची आहे. आज अनेकजण केवळ लग्नासाठी नोकरीच्या मागे लागतात. त्यामुळे त्याचा परिणाम उद्योगावर होत आहे. उद्योजक पिढी निर्माण करण्यासाठी मुली व महिलांनीही आपली मानसिकता बदलण्याची गरज आहे. आज कुलगुरू डॉ. मृणालिनी फडणवीस यांनी मोठ्या धाडसाने सोलापूर जिल्ह्यातील युवक-युवतींच्या कल्पनांना वाव देण्यासाठी व उद्योजक पिढी निर्माण करण्याकरिता खूप सुंदर प्रकारे या उद्योजकता प्रदर्शनाचे आयोजन केले आहे. याचा निश्चितच फायदा येथील विद्यार्थ्यांना व उद्योजकांना होईल, असेही देशमुख यावेळी म्हणाले. राष्ट्रीयीकृत बँकांनी नवउद्योजकांना मुद्रा तसेच विविध योजनांच्या माध्यमातून युवकांना मदत करावे. यासाठी सोलापूर सोशल फाउंडेशनदेखील नव उद्योजकांच्या मदतीसाठी प्रयत्नशील राहील, असेही आमदार देशमुख यांनी सांगितले.
काडादी यांनी विद्यापीठाच्या या उपक्रमाचे कौतुक करत विद्यार्थ्यांनी नोकरीच्या मागे न लागता आपल्या कल्पनाशक्तीच्या बळावर उद्योजक होण्यासाठी प्रयत्न करण्याचे आवाहन केले. बलवाणी यांनी विद्यार्थ्यांना विविध क्षेत्रातील नव उद्योगाकडे वळण्याचे आवाहन केले.
कुलगुरू डॉ. फडणवीस म्हणाल्या, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठातर्फे युवक-युवतींना उद्योजकतेचे धडे देण्यासाठी प्रथमच अशा उद्योजकता शिबिराचे आयोजन केले. याला चांगला प्रतिसाद मिळाला. वास्तविक आज कृषी, उद्योग, मेडिकल, सेवाक्षेत्रात स्वयं रोजगाराच्या मोठ्या संधी उपलब्ध आहेत. त्या संधीची माहिती मिळावी व उद्योजक पिढी निर्माण व्हावी, या उद्देशाने विद्यापीठातील इनक्युबेशन सेंटरच्यावतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. पूर्वी भारतात घरोघरी उद्योग होते. नंतरच्या काळात यात खंड पडला, आता पुन्हा एकदा घरोघरी उद्योग सुरू करण्याची गरज आहे. त्यासाठीच या कार्यक्रमाचे आयोजन केल्याचे कुलगुरू डॉ. फडणवीस यांनी यावेळी सांगितले.
प्रदर्शन पाहण्यासाठी दिवसभर विद्यार्थी, शिक्षक, कर्मचारी तसेच नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. या प्रदर्शनासाठी मागास समाज सेवा मंडळाचे सुभाष चव्हाण यांचे सहकार्य लाभले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. तेजस्विनी कांबळे व प्रा. ममता बोल्ली यांनी केले तर आभार डॉ. माणिकशेटे यांनी मानले.