येस न्युज मराठी नेटवर्क : देशातील कोरोना प्रादुर्भावाचा वेग जरी काहीसा मंदावला असला तरी, देखील अद्यापही बाधितांची संख्या मोठ्या संख्येने वाढताना दिसत आहे. देशातील करोनाबाधितांच्या एकूण संख्येने आता ७० लाखांचा टप्पा देखील ओलांडला आहे. मागील २४ तासांमध्ये देशभरात ७४ हजार ९१८ नवे करोना रुग्ण आढळले. तर, ९१८ जणांचा मृत्यू झाला आहे. देशभरातील करोनाबाधितांची एकूण संख्या आता ७० लाख ५३ हजार ८०७ वर पोहचली आहे.
देशभरातील एकूण ७० लाख ५३ हजार ८०७ करोनाबाधितांच्या संख्येत ८ लाख ६७ हजार ४९६ अॅक्टिव्ह केसेस, डिस्चार्ज झालेले ६० लाख ७७ हजार ९७७ जण व आतापर्यंत मृत्यू झालेल्या १ लाख ८ हजार ३३४ जणांच्या संख्येचा समावेश आहे. आरोग्य मंत्रालयाच्या हवाल्याने एएनआयने हे वृत्त दिले आहे.
सध्या करोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत आहे. करोनाचा आलेखही वर खाली होत असल्याचं दिसून येत आहे. कधी अचानक करोनाबाधितांची संख्या अधिक असते तर कधी त्यांच्या तुलनेत कमी प्रमाणात करोनाबाधित आढळून येतात. अशा परिस्थितीत करोनावर नियंत्रण मिळवण्यासाठी अनेक देशांमध्ये लस विकसित करण्याचे प्रयत्न सुरू आहेत.