पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाद्वारे मार्च महिन्यात घेण्यात आलेल्या दहावीच्या परीक्षेचा निकाल बुधवारी अखेर जाहीर करण्यात आला. यंदाचा निकाल तब्बल ९५.३० टक्के लागला असून गतवर्षीच्या तुलनेत १८.२० टक्के अधिक विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. यंदाही विद्यार्थ्यांच्या तुलनेत विद्यार्थिनींनी बाजी मारली आहे. विभागीय निकालात कोकणमध्ये सर्वाधिक तर औरंगाबादमध्ये सर्वात कमी निकाल नोंदवला गेला. विद्यार्थ्यांना हा निकाल दुपारी एकनंतर ऑन लाइन पाहता येणार आहे.
राज्यात नऊ विभागीय मंडळांकडून ३ मार्च ते २३ मार्च या कालावधीत दहावीची परिक्षा घेण्यात आली. या परीक्षेसाठी १५ लाख ८४ हजार २६४ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी १५ लाख ७५ हजार १०३ विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष परीक्षा दिली. त्यापैकी १५ लाख १ हजार १०५ विद्यार्थी उत्तीर्ण झाले.
विभागीय निकालांमध्ये कोकण विभागाने बाजी मारली. कोकण विभागाचा निकाल ९८.७७ टक्के लागला. तर सर्वात कमी निकालाची नोंद औरंगाबाद येथे (९२.० टक्के) लागला. पुणे विभागाचा निकाल ९२.५० टक्के लागला. यंदाही विद्यार्थिनींनी विद्यार्थ्यांना मागे टाकले. राज्यभरातून ९६.९१ टक्के विद्यार्थिनी तर ९३.९० टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले. विद्यार्थ्यांच्या तुलनेत ३.०१ टक्के अधिक विद्यार्थिनी उत्तीर्ण झाल्या. परीक्षा दिलेल्यांपैकी ९२.७३ टक्के दिव्यांग विद्यार्थी उत्तीर्ण झाले.
इथे पहा निकाल
विद्यार्थ्यांना हा निकाल www.mahresult.nic.in , www.sscresult.mkcl.org आणि www.maharashtraeducation.com या वेबसाइटवर पाहता येईल. त्याचप्रमाणे प्रिंटदेखील घेता येईल. उत्तरपत्रिकांच्या पुनर्मूल्यांकनासाठी ऑनलाइन पद्धतीने मंडळाच्या वेबसाइटवरून अर्ज करायचा असून, त्यासाठी आधी छायाप्रत घ्यावी लागणार आहे. गुणपडताळणीसाठी ३० जुलै ते ८ ऑगस्ट तर उत्तरपत्रिकेच्या छायांकित प्रतिसाठी ३० जुलै ते १८ ऑगस्ट या कालावधीत अर्ज करता येणार आहे. असे देखील डॉ. भोसले यांनी स्पष्ट केले