पंढरपूर : एका अमेरिकन व त्याचबरोबर असलेल्या तीन भारतीय नागरिकांनी होम कॉरंटाईन असतानाही तोंडाला मास्क न लावल्याने त्याच्याविरुद्ध पंढरपूर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, एरिक कोअजारनूर (वय ५५, रा. न्यूयार्क, अमेरिका), जोसेफ डायस (वय ३५, रा. बेळगाव, राज्य कर्नाटक), अमित रवींद्र पवनीकर (वय २७, रा. नंदनवन, नागपूर) व लोकनाथ स्वामी (वय ७१, रा. आरेवाडी, ता. तासगाव, जिल्हा. सांगली)
हे चौघेजण अत्यावश्यक सेवा देण्याबाबतचा पास घेऊन थेऊर ( पुणे) येथून पंढरपुरातील इस्कॉन मंदिरात आले होते. त्यांची पंढरपूर जिल्हा रुग्णालयांमध्ये तपासणी करण्यात आली होती त्या सर्वांना होम कॉरंटाईन केल्ल्याबाबतचा शिक्के मारण्यात आले होते.
हे चौघेजण वाहनांबरोबर परत जाणे अपेक्षित असताना ते परत न जाता इस्कॉन मंदिर पंढरपूर येथे थांबले. तसेच अमेरिकन नागरिक मंदिर परिसरात फिरताना आढळून आले. या सर्वांनी जिल्हाधिकारी यांच्या आदेशाचा भंग केला. त्याचबरोबर संसर्गजन्य आजारांचा संसर्गाचे उपाययोजना म्हणून तोंडाला मास्क अथवा रुमाल बांधला नव्हता. संसर्गजन्य रोगाचे बाबतीत जीवितास धोका होईल असे निष्काळजीपणा व हायगयीचे कृत्य केले. त्यामुळे त्यांच्याविरुद्ध तालुका पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल केल्याची माहिती पोलिस निरीक्षक किरण अवचर यांनी दिली.