झारखंड : झारखंड विधानसभा निवडणुकीचे अंतिम निकाल हाती आले नसले तरी सत्तेच चित्र स्पष्ट झाल आहे. २०१४च्या विधानसभा निवडणुकीत ४३ जागा जिंकत स्पष्ट बहुमत मिळवणाऱ्या भाजपाची यावेळी घसरण झाली आहे. भाजपा केवळ ३० जागांवर आघाडीवर असून, काँग्रेस-जेएमएम आणि राजद आघाडीला जनतेनं कौल दिला आहे. काँग्रेस-जेएमएम आघाडी ४२ जागांवर आघाडीवर आहे. झारखंड विधानसभेची संख्या ८१ असून, बहुमतासाठी ४१ आमदारांची गरज आहे.
झारखंड विधानसभा निवडणुकीचे चित्र स्पष्ट झाले असून, सत्तेत असलेल्या भाजपाला पराभवाचा सामना करावा लागला आहे. भाजपा २९ जागांवर आघाडीवर आहे. तर काँग्रेस-जेएमएमनं बहुमताचा आकडा पार केला आहे. झारखंड निकालावर काँग्रेसचे नेते राजीव सातव यांनी प्रतिक्रिया व्यक्त करताना भाजपावर टीका केली आहे. “लोकसभेत जनतेनं भाजपाला निवडून दिलं. मात्र, मोदी त्यांच्याच मनातील बात करत होते. त्यामुळे लोकांनी त्यांना स्वतःच्या मनातील बात ऐकवली आहे. राज्यांना गृहित धरू नका, असाच संदेश झारखंड निवडणुकीच्या निकालानं दिला आहे. झारखंडमध्ये काँग्रेस सरकार बनवणार आहे,” असा दावाही सातव यांनी यावेळी केला.