महाराष्ट्र साहित्य परिषद जुळे सोलापूर शाखेच्यावतीने भावपूर्ण श्रद्धांजली
————————————————————————————
सोलापूर – ज्येष्ठ विधिज्ञ व बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र आणि गोवाचे माजी सदस्य,आणि पुण्याच्या महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या विश्वस्त मंडळाचे माजी अध्यक्ष ऍड. भास्करराव आव्हाड यांचे निधन झाले. ते ७० वर्षांचे होते. त्यांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आल्याने त्यांना उपचारासाठी एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तिथे तीन ते चार दिवसांपासून उपचार घेत होते. त्यांच्या पश्चात मुलगा ऍड. अविनाश आव्हाड, मुलगी, पत्नी, असा परिवार आहे. आव्हाड यांच्या जाण्याने शहरातील वकील वर्गातून मोठी हळहळ व्यक्त होत आहे.
आव्हाड यांचे बंधू सुधाकरराव आव्हाड आणि एकनाथराव आव्हाड हे देखील ज्येष्ठ विधिज्ञ म्हणून परिचित आहेत. केवळ वकिलीच नव्हे तर सामाजिक, सांस्कृतिक, क्षेत्रात वावर असणारे व्यक्तिमत्त्व म्हणून भास्करराव आव्हाड यांची ओळख होती. तसेच ते विद्यार्थीप्रिय शिक्षक होते. लॉकडाऊनच्या काळात देखील कायद्याचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांना त्यांनी मार्गदर्शन करण्याचे काम त्यांनी केले. विविध वृत्तपत्रे, मासिके, दिवाळी अंक यातून लेखन करून समाजात कायद्याविषयी जनजागृती व्हावे यासाठी त्यांनी लिहिलेले लेख चिंतनीय आहेत. नगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील एका खेड्यात जन्म झालेल्या आव्हाड यांना महाराष्ट्रातील विविध सामाजिक संस्थानी पुरस्काराने गौरवले होते.
विद्यार्थ्यांकडून कुठलाही मोबदला न घेता त्यांना कायद्याचे धडे देणारे विद्यार्थी प्रिय शिक्षक हरपल्याने पुणे शहरातील त्यांच्या वकील विद्यार्थ्यांवर आणि साहित्य विश्वात आव्हाड यांच्या जाण्याने शोककळा पसरली आहे.