येस न्युज मराठी नेटवर्क : प्रेमळ व्यक्तिमत्त्व व कसदार अभिनयाने मराठी, हिंदी सिनेसृष्टीत स्वत:ची वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या ज्येष्ठ अभिनेत्री आशालता बावगावकर यांचं आज निधन झालं. त्या ७९ वर्षांच्या होत्या. करोनाची लागण झाल्यानंतर त्यांना साताऱ्यातील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तिथंच आज सकाळी पावणे पाचच्या सुमारास त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
‘काळूबाईच्या नावानं चांगभलं’ या मालिकेच्या चित्रीकरणादरम्यान त्यांना करोनाची लागण झाली. आशालता यांच्यासह काळूबाईच्या सेटवर काम करणाऱ्या २७ जणांना करोनाची लागण झाली आहे. विशेष म्हणजे मालिकेच्या चित्रीकरणासाठी मुंबईवरून एक डान्स ग्रुप बोलावण्यात आला होता. यांच्यामार्फत करोनाची लागण झाल्याचं बोललं जात होतं. करोनाचा संसर्ग झाल्यानंतर सोमवारी अचानक त्यांची प्रकृती खालावली. त्यानंतर त्यांना साताऱ्यातील प्रतिभा रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आलं होतं.