सोलापूर,दि.3: जिल्ह्यात यंदा मक्याचे भरघोस उत्पादन आले असून किमान आधारभूत किंमत योजनेंतर्गत 2387 शेतकऱ्यांकडून 60 हजार 868 क्विंटल मका खरेदी केला आहे. हा मका सार्वजनिक वितरण व्यवस्थेंतर्गत अंत्योदय, प्राधान्य कुटुंब योजनेत वाटप करण्यात येणार असल्याची माहिती अन्नधान्य वितरण अधिकारी उत्तम पाटील यांनी दिली.
सप्टेंबर, ऑक्टोबर आणि नोव्हेंबर 2020 या तीन महिन्यांसाठी सोलापूर ग्रामीण भागात तेवढ्या प्रमाणात गव्हाचे नियतन कमी करून मक्याचे वितरण करण्यात येणार आहे. अंत्योदय अन्न योजनेतील लाभार्थ्यांना प्रती शिधापत्रिका 5 किलो 1 रूपये किलो याप्रमाणे तर प्राधान्य कुटुंब लाभार्थी योजनेतील प्रतीलाभार्थी 1 किलो 1 रूपये दराने रास्त भाव दुकानात वितरित करण्यात येणार आहे. अंत्योदय अन्न योजनेत प्रती कार्ड गहू 20 किलो, मका 5 किलो आणि तांदूळ 10 किलो असे एकूण 35 किलो धान्याचे वाटप होणार आहे. प्राधान्य कुटुंब योजनेतील कार्डधारकांना गहू 2 किलो, मका 1 किलो आणि तांदूळ 2 किलो, असे 5 किलो धान्य वाटप होणार आहे.
जिल्ह्यातील अंत्योदय योजनेतील 57 हजार 272 शिधापत्रिकाधारकांना 2863.60 क्विंटल तर प्राधान्य कुटुंब लाभार्थी योजनेतील 17 लाख 62 हजार 980 लाभार्थ्यांना 17,62,980 क्विंटल मक्याचे वाटप होणार असल्याचे पाटील यांनी सांगितले.