सोलापूर : जिल्ह्यात ग्रामपंचायत स्तरावर दि ८ ऑगस्ट ते १५ ऑगस्ट २०२० या एक आठवड्याच्या कालावधीत वैयक्तिक व सार्वजनिक स्वच्छता बाबत जनजागृतीसाठी ‘गंदगीमुक्त भारत अभियान’ राबविले जाणार असल्याची माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रकाश वायचळ यांनी दिली.
‘गंदगीमुक्त भारत अभियान’ बाबत मुख्य कार्यकारी अधिकारी प्रकाश वायचळ म्हणाले , दि. ८ अॉगस्ट रोजी या अभियानाचे तालुकास्तरावर उदघाटन होणार असून या अभियानाच्या माध्यमातून सर्व ग्रामपंचायतीमध्ये स्वच्छतेविषयी वर्तन बदल घडवून आणण्यासाठी आणि आरोग्यदायी सवयी सक्रीय सहभाग नोंदविण्यासाठी यशस्वी व प्रभावी अंमलबजावणी करण्यात येणार आहे.
या अभियानांतर्गत ०८ ऑगस्ट रोजी सर्व तालुकास्तरावर गंदगीमुक्त भारत अभियान शुभारंभ व सरपंचासोबत इ – संवाद , ९ ऑगस्ट रोजी ग्रा.पं. स्तरावर सिंगल युज प्लॅस्टिकचे संकलन व वर्गीकरण दि. १० ऑगस्ट रोजी ग्रा.पं. व सार्वजनिक /शासकीय इमारतीची स्वच्छता व रंगरंगोटी तसेच स्वच्छाग्रही मार्फत ओडीएफ प्लस बाबत रॅपिड प्रो प्रणाली व आयव्हीआरच्या माध्यमातून टोल फ्री क्र.18001800404 वरून प्रतिसाद नोंदवण्यात येणार आहे.दि. ११ ऑगस्ट रोजी गावामध्ये वॉल पेटींग स्वच्छता बाबत संदेश रंगवले जाणार आहेत.
दि.१२ ऑगस्ट रोजी श्रमदानातून वृक्षारोपण दि.१३ ऑगस्ट रोजी गंदगीमुक्त मेरा गाव विषयावर ऑनलाईन पेंटिंग स्पर्धा ( इ ६ वी ते ८ वी) तसेच याच विषयावर र्निबध स्पर्धा (इ ९ ते १२ वी) घेण्यात येणार आहे. दि.१४ ऑगस्ट रोजी प्राथमिक आरोग्य केंद्र व गावात स्वच्छता व औषध फवारणी करण्यात येणार आहे.दि.१५ ऑगस्ट रोजी ग्रामसभा मध्ये गावाच्या ओडीएफ प्लस दर्जा बाबत घोषणा करण्यात येणार आहे.
या अभियानांतर्गत गावात उपक्रमाचे आयोजन करताना कोविड १९ च्या प्रादुर्भावाचा विचार करता यासंबंधीच्या मार्गदर्शक सुचनांचे पालन करणे अपेक्षित आहे.त्यामुळे या अभियानांर्तगत उपक्रमांना ग्रामस्थांनी सकारात्मक प्रतिसाद द्यावा असे आवाहन उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पाणी व स्वच्छता ) विजय लोंढे यांनी केले आहे.