सोलापूर,दि.22: ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी ’ मोहिमेतून जिल्ह्यातील ग्रामीण भागातील आठ लाख दहा हजार 739 घरांचे आणि 36 लाख 48 हजार 331 लोकांचे सर्व्हेक्षण केले जाणार आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी आज येथे दिली.
राज्य शासनाच्या वतीने कोरोना विषाणूचा प्रसार थांबविण्यासाठी ‘माझे कुटुंब-माझी जबाबदारी ’ मोहिमेची अंमलबजावणी केली जात आहे. या मोहिमेतून सोलापूर शहर आणि जिल्ह्यातील प्रत्येक घरापर्यंत पोहोचून सर्व्हेक्षण केले जाणार आहे. जिल्हाधिकारी शंभरकर यांनी याबाबत आढावा घेतला. यावेळी महापालिका आयुक्त पी.शिवशंकर, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अर्जुन गुंडे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. भीमाशंकर जमादार, मनपा आरोग्य अधिकारी डॉ.शीतलकुमार जाधव, उपमुख्य कार्यकारी अधिकारी चंचल पाटील, क्षेत्रीय प्रचार अधिकारी अंकुश चव्हाण, डॉ.सोनिया बगाडे, डॉ.श्रद्धा शिरसी आदी उपस्थित होते.
शंभरकर यांनी सांगितले की, “जिल्ह्यातील प्रत्येक गावांत आरोग्य पथक पोहोचेल याची खबरदारी घ्या. आरोग्य पथकातील स्वयंसेवक आणि आरोग्य कर्मचारी यांना सर्व्हेक्षण कसे करायचे, माहिती कशी भरायची याचे योग्य प्रशिक्षण द्यावे. आरोग्य पथकाला पल्स ऑक्सिमीटर, थर्मल गन, मास्क, सॅनिटायझर, टोपी, टी शर्ट पुरवा.”
या मोहिमेत सामाजिक संस्था, स्वयंसेवी संस्था, लोकप्रतिनिधी, राजकीय पक्ष यांना सहभागी करुन घेण्यासाठी प्रयत्न करा, असे श्री. शंभरकर यांनी सांगितले.
जिल्ह्यातील 8 लाख 10 हजार 739 घरांतील 36 लाख 48 हजार 331 लोकांचे सर्व्हेक्षण केले जाणार आहे. यासाठी 1621 पथकांची नियुक्ती करण्यात आली आहे. प्रत्येक पथकात तीन कर्मचारी आहेत. सोमवार अखेर तीन लाख 63 हजार 424 घरांचे सर्व्हेक्षण करुन 16 लाख 70 हजार 713 लोकांची तपासणी करण्यात आली, अशी माहिती डॉ.जमादार यांनी दिली.
मोहिमेच्या पहिल्या टप्प्यात 15 सप्टेंबर ते 10 ऑक्टोबरपर्यंत सर्व्हेक्षण केले जाणार आहे. दुसरा टप्पा 12 ऑक्टोबर ते 24 ऑक्टोबर या कालावधीत असणार आहे.
जिल्ह्यातील सर्व शासकीय कार्यालयात आज घेतली जाणार सामूहिक शपथ
‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ या मोहिमेत जास्तीत जास्त लोकांचा सहभाग वाढावा यासाठी जिल्हा प्रशासनाने विविध उपक्रम राबविण्याचे ठरविले आहे. याचाच भाग म्हणून उद्या बुधवारी जिल्ह्यातील सर्व शासकीय आणि निमशासकीय कार्यालयात कोरोना जागृतीबाबत सामूहिक शपथ घेतली जाणार आहे. जिल्हाधिकारी कार्यालयात सकाळी 11 वाजता जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांच्या उपस्थितीत शपथ दिली जाणार आहे. अशाचप्रमाणे महानगरपालिका, जिल्हा परिषद, पोलीस आयुक्त कार्यालय, पोलीस अधीक्षक कार्यालय येथेही शपथ दिली जाणार आहे. जिल्ह्यातील सर्व तहसीलदार कार्यालये, पंचायत समिती येथेही शपथ दिली जाणार आहे.