मुंबई, दि. 25 :- रुग्णसेवेच्या माध्यमातून मानवसेवा करणाऱ्या राज्यातील समस्त फार्मासिस्ट बंधु-भगिनींना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी 25 सप्टेंबर या ‘जागतिक फार्मासिस्ट दिना’च्या शुभेच्छा दिल्या आहेत. डॉक्टर आणि रुग्ण यांच्यातील प्रमुख दुवा असलेले फार्मासिस्ट बांधव रुग्णांसाठी जीवनरक्षक असतात. त्यांच्याशिवाय आरोग्यसेवा अपूर्ण आहे, अशा शब्दात फार्मासिस्ट बंधु-भगिनींच्या सेवेचा गौरव करुन उपमुख्यमंत्र्यांनी त्यांच्या रुग्णसेवेबद्दल कृतज्ञता व्यक्त केली आहे.
‘जागतिक फार्मासिस्ट दिना’निमित्त शुभेच्छा देतांना उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, आरोग्यसेवेत ‘फार्मासिस्ट’चे स्थान अढळ आहे. ‘फार्मासिस्ट’च्या सहभागाशिवाय रुग्ण रोगमुक्त होणं शक्य नाही. प्रत्येक आजारांचे कारण शोधून त्यावर प्रभावी औषध तयार करणे. औषधाची चाचणी घेऊन सुरक्षित औषध उपलब्ध करणे, औषधांचा पुरवठा कायम ठेवणे, अशा अनेक जबाबदाऱ्या ‘फार्मासिस्ट’ नियोजनबद्धपणे पार पाडत असतात. समाजाला निरोगी ठेवण्यासाठी अहोरात्र योगदान देत असतात. कोरोना संकटकाळातही ‘फार्मासिस्ट’ बांधवांनी उल्लेखनीय कार्य केले आहे. सुरुवातीला सगळे व्यवहार बंद असताना केवळ ‘फार्मसी’ सुरु होत्या. यावरुन त्यांचे महत्व लक्षात येते. रुग्णांना वेळेवर औषधे मिळावीत, औषध पुरवठा अखंड रहावा यासाठी ‘फार्मासिस्ट’ बांधवांनी जोखीम पत्करुन कोरोनाकाळात सेवा दिली आहे. कोरोना प्रतिबंधक लस उपलब्ध करण्यासाठी जगभरातील ‘फार्मासिस्ट’ अहोरात्र परिश्रम करीत आहेत. एका अर्थानं ही मंडळी ‘देवदूता’चे कार्य करीत असून त्याबद्दल त्यांचे अभिनंदन करतो. फार्मासिस्ट बांधवांचं आरोग्यसेवेतील महत्वं, गरज व कामगिरी लक्षात घेऊन सर्वांनी त्यांच्याबद्दल कृतज्ञ असलं पाहिजे. त्यांच्या कार्याचा गौरव झाला पाहिजे. आरोग्ययंत्रणेतील महत्वाचा घटक म्हणून सन्मान मिळाला पाहिजे. यंदाच्या ‘जागतिक फार्मासिस्ट दिना’ निमित्तानं ‘फार्मासिस्ट’ बांधवांच्या कार्याची नोंद सर्वांकडून घेतली जाईल. ‘फार्मासिस्ट’कडे बघण्याचा दृष्टीकोन सकारात्मक होईल, असा विश्वास व्यक्त करीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जागतिक फार्मासिस्ट दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.