सोलापूर : आपल्या सुरक्षेसाठी ऑन ड्युटी चोवीस तास दक्ष असणाऱ्या पोलिसांविषयी एक सकारात्मक बातमी समोर आली आहे .
काल म्हणजेच मंगळवारी (21 एप्रिल 2020) रात्री साधारण 12 वाजण्याच्या सुमारास सलगर वस्ती पोलीस ठाण्याच्या हद्दीत वाहतूक शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विजयानंद पाटील आणि त्यांचे सहकारी रात्र गस्तीवर होते. सगळीकडे शुकशुकाट होता. मात्र रामवाडी दवाखान्याजवळ दोन महिला चालत जाताना दिसल्या. सुरक्षेच्या कारणास्तव पोलिसांनी त्यांना हटकले. ‘पोटात वेदना होऊ लागल्याने सिव्हिल हॉस्पिटलमध्ये चालत निघालो आहोत.. साहेब रिक्षा अगर कोणतेच वाहन मिळाले नाही.. आणि पोटात जास्त दुखू लागल्याने चालत निघालो होतो..! काय करणार..?’ असे त्यांनी पोलिसांना सांगितले. त्यानंतर पोलिसांनी गरोदर महिला रविना आणि सासू सिंधू या दोघींना पोलिस वाहनात बसविले. काही वेळातच सुरक्षितपणे दोघींना उपचारासाठी शासकीय रुग्णालयात नेऊन सोडले.
काळे कुटुंबीयांनी सहाय्यक पोलीस निरीक्षक विजयानंद पाटील, त्यांचे सहकारी वाहन चालक पोलिस शिपाई बेलछत्रे यांचे आभार मानले. पोलीस सदैव जनतेच्या सुरक्षेसाठी सज्ज असतातच; लॉकडाऊनच्या काळात तर पोलिसांची ही कामगिरी खरंच कौतुकास्पद आहे.