सोलापूर : श्री छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रूग्णालय येथील नवीन बी ब्लॉक येथे कोविड-19 कक्ष स्थापन करण्यासाठी 20 खाटांचे अतिदक्षता विभाग (आयसीयू) जलद गतीने स्थापन करणे आणि जेम पोर्टलवरून यंत्रसामग्री खरेदी करण्यासाठी जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी अपर जिल्हाधिकारी संजीव जाधव यांच्या अध्यक्षतेखाली समितीची स्थापना केली आहे.
जिल्ह्यात व सोलापूर शहरात कोरोनाचे रूग्ण वाढत आहेत. शासकीय दवाखान्यात अतिरिक्त ताण वाढू नये, यासाठी श्री छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रूग्णालय येथील नवीन बी ब्लॉक येथे 80 खाटांचे सर्वसाधारण तर 20 खाटांचे अतिदक्षता विभाग कक्ष सुरू करण्यास शासनाची मान्यता मिळाली आहे. यातील 80 खाटांचे कोविड सर्वसाधारण कक्ष ऑक्सिजनसह सुरू झाला आहे. अतिदक्षता विभागाचे काम जलद गतीने होण्यासाठी आणि यासाठी लागणाऱ्या यंत्रसामग्रीची खरेदी करण्यासाठी श्री. शंभरकर यांनी समितीची स्थापना केली आहे. या समितीमध्ये अध्यक्ष श्री. जाधव यांच्यासह सदस्य सचिव म्हणून जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. प्रदीप ढेले तर सदस्य म्हणून महानगरपालिकेचे आरोग्य अधिकारी डॉ. शितल जाधव, प्रो. डॉ. अग्रवाल, जिल्हा परिषदेचे लेखा व कोषाधिकारी महेश आवताडे यांचा समावेश आहे.
समितीची कामे खालीलप्रमाणे
- श्री छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रूग्णालय येथील नवीन बी ब्लॉक येथे कोविड-19 कक्ष स्थापन करण्यासाठी संरचनेबाबत निर्णय घेणे.
- निकडीची व गांभीर्याची बाब म्हणून शीघ्र सेवा आणि वस्तू खरेदी प्रक्रिया ठरवून ती राबवणे.
- कक्षासाठी लागणाऱ्या मनुष्यबळाची नियुक्ती करणे.
- जेम पोर्टलद्वारे आणि निविदा प्रक्रियेद्वारे यंत्रसामग्री माफक दरामध्ये खरेदी करणे.
- कक्षासाठी अंदाजित रक्कम, खर्च या वित्तीय बाबींना प्रशासकीय मंजुरी देणे.
- कक्षाबाबतच्या अनुषंगिक कामांचा व प्रगतीचा आढावा घेणे.