सोलापूर दि. 18 :- कोरोना विषाणूच्या प्रतिबंधासाठी आवश्यक असणारी वैद्यकीय यंत्रसामग्री, साहित्य आणि औषधे खरेदी करण्यासाठी जिल्हा नियोजन समिती (डीपीसी) मधून आवश्यक तेवढा निधी दिला जाईल, असे पालकमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी आज सांगितले.
पालकमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी आज कॅान्फरन्स द्वारे जिल्ह्यात कोरोना प्रतिबंधासाठी केल्या जात असलेल्या उपाययोजनांचा आढावा घेतला. व्हिडीओ कॅान्फरन्समध्ये सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयातून जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, महापालिका आयुक्त दीपक तावरे, पोलीस अधीक्षक मनोज पाटील, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रकाश वायचळ, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. प्रदीप ढेले, आरोग्य अधिकारी डॉ. भीमाशंकर जमादार, महापालिका आरोग्य अधिकारी डॉ. संतोष नवले आदी उपस्थित होते.
पालकमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी सांगितले की कोरोना प्रतिबंधासाठी आवश्यक असणारी वैद्यकीय यंत्रसामग्री, साहित्य याची खरेदी जिल्हा नियोजन समितीच्या नाविन्यपूर्ण योजनेतून केली जावी. यास राज्य शासनाने सहमती दिली आहे. आवश्यक असणारे व्हेंटिलेटर, बेड, पीपीई, मास्क, सॅनिटायझर, आयसोलेशन आणि क्वारंटाईन सेलसाठी लागणारे साहित्य याची लवकरात लवकर खरेदी करावी. यासाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही.
प्रारंभी, जिल्हाधिकारी मिलींद शंभरकर यांनी कोरोनाच्या प्रतिबंधासाठी केलेल्या उपाययोजनांची माहिती दिली. श्री. तावरे, श्री. पाटील आणि श्री. वायचळ यांनीही सोलापूर महापालिका, जिल्हा परिषद आणि पोलीस करीत असलेल्या कार्यवाहीची माहिती दिली.
पालकमंत्री यांनी केले प्रसारमाध्यमांचे कौतुक
कोरोना विषाणूच्या प्रसाराबाबत लोकप्रबोधन केल्याबद्दल सोलापुरातील प्रसारमाध्यमे आणि त्यांचे प्रतिनिधी यांचे पालकमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी कौतुक केले. सोलापुरातील सर्वच दैनिके, वाहिन्या, केबल चॅनेल यांनी कोरोना प्रसाराला प्रतिबंधासाठी लोकांचे प्रबोधन केले आहे. यापुढेही अशीच सकारात्मक भूमिका ठेवून जनजागृती करावी, असे आवाहनही त्यांनी केले. जिल्हा प्रशासनाने ही चांगले काम केले असल्याचे त्यांनी सांगितले.
पालकमंत्री वळसे-पाटील यांनी दिलेल्या सूचना
• शासनाच्या आदेशाची परिणामकारक अंमलबजावणी करा.
• अफवा पसरवणा-यांवर गुन्हे दाखल करा.
• विभाग प्रमुखांनी मुख्यालय सोडू नये.
• क्षेत्रिय अधिका-यांनी समन्वय ठेवावा.
• गर्दी टाळण्यासाठी आणखी उपाययोजना करा.
• जिल्हाधिकारी यांच्या आदेशाचे पालन करा.