सोलापूर (प्रतिनिधी)कोरोनाविरूद्धच्या लढाईत भाजपचा प्रत्येक कार्यकर्ता सहभागी आहे. सर्वांनी एकत्र येऊन कोरानावर मात करू या. महापालिका प्रशासन चांगले कार्य करत आहे. या कोरानाच्या लढाईत कोणतेही सहकार्य लागले तर पक्षाच्यावतीने निश्चित करण्यात येईल, असे खा. डॉ. जयसिद्धेश्वर महास्वामी, आ. सुभाष देशमुख आणि आ. विजयकुमार देशमुख यांनी म्हटले आहे.
सोमवारी भाजपचे खासदार आणि दोन्ही आमदारांनी नूतन पालिका आयुक्त पी. संकर यांची भेट घेत कोरानाविरूद्धच्या लढाईत सहकार्य असल्याचे सांगितले. कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी सार्वजनिक ठिकाणी म्हणजे भाजीमंडई, मनपा आरोग्य केंद्रे आदी ठिकाणी जंतुनाशक फवारणी करावी, हद्दवाढ भागात कोरोना रूग्ण सापडल्यास ठराविक नागरिकांचा सर्व्हे केला जातो. तसे न करता संपूर्ण हद्दवाढ भागातील नागरिकांचा सर्व्हे करावा, पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर डेंग्यूचा फैलाव रोखण्यासाठी गटारी, नाल्यांची साफसफाई करावी, सर्व प्रभागात फिव्हर ओपीडी करावी, सिव्हीलमध्ये इतर आजारासाठी आलेल्या रूग्णांना आणि त्यांच्या नातेवाईकांना कोरानाची लागण होत आहे. त्यामुळे सिव्हील हॉस्पिटलमध्ये रोज जंतुनाशक फवारणी करावी आदी मागण्या पक्षाच्यावतीने करण्यात आल्या.