सोलापूर,दि. 16: जिल्हा पुरवठा कार्यालयाकडून केशरी कार्डधारकांना मे महिन्यासाठीचे 52 हजार 793 क्विंटल धान्याचे वाटप झाल्याची माहिती जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी आज दिली. अंत्योदय व प्राधान्य कुटुंब तसेच प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेतील लाभार्थ्यांना एकूण 1 लाख 53 हजार 961 क्विंटल धान्याचे वाटप झाल्याचेही त्यांनी सांगितले.
सार्वजनिक वितरण व्यवस्थेच्या सर्व योजनेतील लाभार्थ्यांना मे महिन्यातील धान्याचे वाटप आणखी सुरूच आहे. 15 मेपर्यंत एक लाख 53 हजार 961 क्विंटल धान्याचे वाटप झालेले आहे. मे व जून महिन्यात केशरी कार्डधारकांना धान्याचे वाटप होणार आहे. जिल्ह्यातील केशरी कार्डधारकांची संख्या एकूण तीन लाख 89 हजार 82 आहे. तर लाभार्थ्यांची संख्या एक कोटी 7 लाख 47 हजार 691 आहे. प्रति लाभार्थी तीन किलो गहू व दोन किलो तांदूळ देण्यात येत आहे.
मे महिन्यातील सर्व लाभार्थ्यांसाठी तीन लाख 54 हजार 900 क्विंटल धान्याची मागणी आहे. त्यानुसार पुरवठा कार्यालयाकडून वाटप सुरू आहे. तर जून महिन्यासाठी सर्व लाभार्थ्यांना तीन लाख 36 हजार 100 क्विंटल धान्याची मागणी करण्यात आली आहे, त्यानुसार वाटप केले जाणार आहे, असे शंभरकर यांनी सांगितले.