दुबई : इंडियन प्रीमियर लीगच्या 13 व्या मौसमात जबरदस्त फॉर्मात असलेली कोलकाता नाइट रायडर्सची टीम अडचणीत येऊ शकते. कोलकाताचा स्टार गोलंदाज सुनील नरेनच्या गोलंदाजीच्या अॅक्शन विरोधात तक्रार करण्यात आली आहे. शनिवारी सुनील नरेनने कोलकात्याला किंग्ज इलेव्हन पंजाबविरुद्ध दोन धावांनी विजय मिळवून देण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली होती.
सुनील नरेनच्या गोलंदाजीच्या अॅक्शनच्या तक्रारीबद्दल माहिती आयपीएल म्हटते, “ऑन-फील्ड अंपायर उल्हास गांधी आणि क्रिस गफाणे यांनी नरेनच्या संशयित गोलंदाजीच्या अॅक्शन विरुद्ध अहवाल तयार केला आहे. यात सुनील नरेनला ताकीत देत चेतावणी यादीत टाकण्यात आले आहे. असे असले तरी नरेनला गोलंदाजीची परवानगी देण्यात आली आहे.”
सुनील नरेनसाठी आता स्पर्धेतील पुढचा प्रवास सोपा नसरणार आहे. आयपीएलकडून स्पष्ट करण्यात आले आहे की, नरेन विरोधात आणखी एक तक्रार आल्यास या स्पर्धेत नरेनला गोलंदाजीसाठी बंदी घालण्यात येईल. यानंतर नरेनला आयपीएलमधील गोलंदाजीसाठी बीसीसीआयच्या बॉलिंग अॅक्शन कमिटीकडून क्लीन चिट घ्यावी लागेल. नरेन या पूर्वीदेखील त्याच्या गोलंदाजीच्या अॅक्शनबाबात वादात सापडला होता. नरेनच्या गोलंदाजीच्या कारवाईबद्दल 2014 मध्ये पहिली तक्रार करण्यात आली होती.