सोलापूर दि. 28 : कोरोना विषाणूच्या प्रतिबंधासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना आखण्यासाठी जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 च्या कलम 144 (1) व (3) नुसार सुधारीत आदेश आज जारी केले. या आदेशानुसार केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या अखत्यारीतील अत्यावश्यक सेवेतील कार्यालये वगळून सर्व कार्यालये दिनांक 14 एप्रील 2020 पर्यंत बंद राहतील.
1) केंद्र सरकारच्या अधिपत्याखालील कार्यालये बंद राहतील. मात्र पुढील कार्यालये सुरू राहतील:- संरक्षण, केंद्रीय पोलीस दल, ट्रेझरी, सार्वजनिक उपक्रम (पेट्रोलियम, CNG, LPG, PNG) आपत्ती व्यवस्थापन, उर्जा निर्मिती व वाहन करणारे विभाग, पोस्ट ऑफिसेस, राष्ट्रीय सूचना केंद्र.
2) राज्य शासनाची कार्यालये, स्वायत्त संस्था व महामंडळे बंद राहतील. मात्र पुढील कार्यालये सुरू राहतील: – पोलीस , होमगार्ड, नागरी संरक्षण दल, अग्निशमन यंत्रणा आणि अत्यावश्यक सेवा, आपत्ती व्यवस्थापन आणि तुरुंग सेवा, वन विभागाकडील सर्व प्राणी संग्रहालये, नर्सरी, वन्य जीव, जंगलातील आग विझवणारी यंत्रणा, वृक्षारोपणाची जोपासणा, गस्ती पथक, समाज कल्याण विभागाकडील बाल गृहे, दिव्यांग व्यक्ती, ज्येष्ठ नागरीक, निराधार, स्त्रिया, विधवा इत्यादींची निरीक्षण गृहे, जिल्हा प्रशासन, ट्रेझरी, वीज, पाणी आणि सार्वजनिक स्वच्छता, महानगरपालिका, नगरपालिका- अत्यावश्यक सेवेसाठी आवश्यक असणारे कर्मचारी, सार्वजनिक आरोग्य, वैद्यकीय शिक्षण, अन्न व नागरी पुरवठा, अन्न आणि औषध प्रशासन.
3) जिल्ह्यातील सर्व प्रवाशांच्या हालचालीसाठी राज्याची व जिल्ह्याची सीमा बंद करण्यात येत आहे. सर्व प्रकारची वाहतूक खासगी यंत्रणेसह बंद करण्यात येत आहे. मात्र महत्वाच्या जीवनावश्यक वस्तू व वस्तूंची वाहतूक चालू राहील.
4) सार्वजनिक वाहतूक सेवा बंद असतील. मात्र वैद्यकीय तातडीच्या कारणासाठी आवश्यक असणारी वाहतूक व्यवस्था चालू राहील. खासगी वाहनांचा वापर जीवनावश्यक वस्तू, आरोग्य सेवा, आणि अधिसूचनेत नमूद करण्यात आलेल्या बाबी याकरीता वाहन चालकाव्यतिरिक्त एका व्यक्तीला करता येईल.
5) सर्व दुकाने /सेवा आस्थापना, उपहारगृहे/खाद्यगृहे/खानावळ, शॉपिंग कॉप्लेक्स, मॉल्स, मनोरंजनाची ठिकाणे क्लब/पब, सिनेमागृहे, नाटयगृहे, व्हिडीओ पार्लर, ऑनलाईन लॉटरी सेंटर, क्रीडांगणे, मैदाने, जलतरण तलाव उद्याने, व्यायामशाळा, संग्रहालये बंद राहतील. मात्र पुढे नमूद केलेल्या जीवनावश्यक वस्तू व सेवांच्या आस्थापना चालू राहतील :- रास्त भाव धान्य दुकाने, किराणा माल, फळे, भाजीपाला, बेकरी (केक शॉप वगळून), दुध व दुग्ध जन्य पदार्थ विक्री वितरण करणारी यंत्रणा, अंडी, मास, मासे, पशुखाद्य व याबाबींकरीता कच्चा माल पुरवठा करणारी यंत्रणा, संबंधित गोदामे व वाहतूक करणारे घटक, शिवभोजन केंद्रे, हॉस्पीटल व संबंधित सर्व वैद्यकीय आस्थापना तसेच त्या संबंधी उत्पादन व वितरण करणारे खासगी व सार्वजनिक क्षेत्रातील घटक, दूरध्वनी संदेश वहन, इंटरनेट सेवा, प्रसारण सेवा, केबल सेवा, Data Services, IT, शीतगृहे आणि गोदामे/कोठार गृहांची सेवा, मुद्रीत व इलेक्ट्रॉनिक माध्यमे, अत्यावश्यक व जीवनावश्यक वस्तुंच्या पुरवठा करणारी वाहतूक व्यवस्था व पुरवठा साखळी, शेतमाल, शेती उत्पादने आणि इतर जीवनावश्यक वस्तू आयात व निर्यात करणारी यंत्रणा, E- commerce द्वारे पुरवठा होणारी जीवनावश्यक व अत्यावश्यक वस्तू उदा. अन्न, औषधे आणि वैद्यकीय उपकरणे, पेट्रोल पंप, LPG Gas, Oil Agencies व त्यांची गोदामे आणि त्यांच्याशी संबंधित वाहतूक व्यवस्था, खासगी सुरक्षा यंत्रणेकडून विविध ठिकाणच्या आस्थापनांना देण्यात येणा-या सुरक्षा आणि सुविधा, टॅकरद्वारे पाणी पुरवठा करणा-या सेवा, सर्व मान्सुन पुर्व कामे करणा-या यंत्रणांचे कामकाज, सर्व बँका व त्यांचे ATM व संलग्न सेवा, रोकड वाहतूकीची सेवा देणा-या कंपन्या, विमा कंपन्या, शासन व रेल्वे सेवेशी संबंधित अत्यावश्यक असणारी माल गोदामे व त्यासंबंधित वाहतूक करणारी यंत्रणा, वीज निर्मिती, वीज वहन आणि वितरण करणारे घटक व सेवा, पशुवैद्यकीय दवाखाने/पशु सेवा केंद्रे, उपहारगृहे मधून घरपोच सेवा व अन्नपदार्थांची पार्सल स्वरुपातील सेवा इ.
6) सर्व शैक्षणिक संस्था, प्रशिक्षण केंद्रे, संशोधन केंद्रे, शिकवणी वर्ग इत्यादी बंद राहतील.
7) औद्योगिक कारखाने, कार्यशाळा आदींचे व्यवहार बंद राहील. मात्र पुढे नमूद केलेले घटक चालू राहील:- जीवनावश्यक वस्तू यामध्ये अन्न व त्याअनुषंगीक वस्तु उदा. दुध व दुग्धजन्य पदार्थ तसेच पशुखाद्य, औषध निर्मिती विक्री व वितरण करणारी यंत्रणा, लस, सॅनिटायझर, साबण-पावडर, मास्क, वैद्यकीय उपकरणे व ज्या वस्तुंची निर्मिती करणा-या घटकांमध्ये प्रक्रिया सातत्य (Continuous Process) आवश्यक आहे असे कारखाने जिल्हाधिकारी यांची परवानगी घेवून ठेवता येतील.
8) सर्व प्रकारची हवाई , रेल्वे व रस्ते वाहतूक सेवा बंद राहतील. मात्र पुढील सेवा चालू राहतील :- अग्निशमन, कायदा व सुव्यवस्था तसेच तातडीची सेवा इत्यादीच्या अनुषगाने करण्यात येणारी वाहतूक. तथापि सदर निर्बंध लोकांच्या वाहतूकीवर निर्बंध घालण्यासाठी आहेत. वस्तुंच्या दळणवळणावर निर्बंध नाहीत.
9) सर्व संप्रदायांची सर्व प्रार्थना व धार्मिक स्थळे लोकांसाठी बंद राहतील. मात्र सार्वजनिक प्रार्थनास्थळे, मशिदी, चर्च, मंदिरे येथे होणा-या दैनंदिन पुजा-अर्चा, दिवाबत्ती व नित्योपचार सुरुच राहील. धार्मिक विधी मंदिर/मशिदी/चर्चे मधील आर्चक/इमाम/पादरी यांचेसह पार पाडावे. भाविकांनी गर्दी टाळावी.
10) लोक एकत्र जमतील अशा सर्व सामाजिक , राजकीय , क्रीडा, मनोरंजन, शैक्षणिक, सांस्कृतिक, धार्मिक कार्यक्रमांना बंदी राहील.
11) आदरांतिथ्याशी संबंधित सेवा स्थगित राहतील, मात्र बंदी मुळे अडकलेले पर्यटक व्यक्ती, वैद्यकीय अत्यावश्यक, आणीबाणीतील सेवेतील कर्मचारी, हवाई आणि सागरी सेवेच्या व्यक्तींच्या राहण्यासाठी उपयोगात आणले जाणारे हॉटेल्स, होम स्टे, लॉजेस आणि मॉटेल्स यांना व विलीगीकरण (क्वारंटाईन) साठी वापरण्यात येणा-या वास्तू (Establishment) यांना यातून सूट देण्यात आलेली आहे.
12) अंत्यविधी सारख्या प्रसंगी गर्दी न करता 20 व्यक्तींना परवानगी देण्यात येत आहे.
13) बंदीच्या काळात अत्यावश्यक गरजेच्या वस्तुंच्या पुरवठयाबाबत कोणताही अडथळा निर्माण होणार नाही यासाठी योग्य त्या उपाययोजना केल्या जातील.
14) COVID-19 च्या रुग्णांना योग्य त्या आरोग्य विषयक सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी सर्व खासगी आणि शासकीय रुग्णालयातील इतर वैकल्पीक शस्त्रक्रीया पुढे ढकलण्यात येतील.
15) 15 फेब्रुवारी 2020 नंतर भारतात आलेल्या आणि विलगीकरणात राहण्याचा निर्देश देण्यात आलेल्या प्रत्येक व्यक्तीने स्थानिक आरोग्य अधिका-याने दिलेल्या निर्देशांचे पालन करावे अन्यथा भारतीय दंड विधान संहिता कलम 1988 नुसार कारवाई करण्यात येईल आणि त्याला संस्थात्मक विलगीकरण सेवेत स्थलांतरीत केले जाईल.
16) सर्व रहिवाशांनी घरातच थांबावे केवळ परवानगी देण्यात आलेल्या कारणांसाठीच त्यांना घराबाहेर पडण्यास परवानगी देण्यात येईल. तथापि बाहेर पउल्यानंतर त्यांना परस्परांपासून किमान तीन फुटाचे अंतर (Social distance) राखण्याचा दंडक पाळणे आवश्यक असेल.
17) उपरोक्त संबंधित संस्था, कर्मचारी यांनी COVID-19 संबंधी आरोग्य विभागाने वेळोवेळी दिलेले निर्देश पाळणे बंधनकारक राहील. सर्व आस्थापनांनी COVID -19 बाबत स्वच्छतेचे उपाय योजावेत.
वर नमूद केलेल्या सर्व कार्यालयांनी सुरक्षित सामाजिक अंतर ठेवण्यासाठी आवश्यक ती उपाययोजना करावी. जसे प्रत्येक व्यक्ती तीन फुटावर उभे राहण्यासाठी खुणा कराव्यात. तसेच तपासणी काऊंटर पासून तीन फुटाचे अंतर असावे. वरील सर्व सेवा देतांना कमीत कमी मनुष्यबळाचा वापर करावा. अत्यावश्यक दुकाने /आस्थापना यांना नियमित वेळेशिवाय 24×7 चालविण्यास देखील मुभा/सवलत राहील. शिवभोजन केंद्रात सेवा देतांना प्रत्येक व्यक्तीस परस्परांपासून किमान 3 फुटाचे अंतर राहील. Data Services, I.T. व त्या संबंधित अत्यावश्यक सेवा देणारे घटक मात्र शक्यातो घरात राहूनच काम पहावे.
वरील आदेशाचे उल्लंघन करणारी व्यक्ती, संस्था अथवा संघटना भारतीय दंड संहिता (45 ऑफ 1860) कलम 188 मधील तरतुदीनुसार दंडनिय कायदेशीर कारवाईस पात्र असून आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 आणि इतर कायदे आणि विनियमे यानुसार कारवाई करण्यात येईल. अशा व्यक्ती, संस्था अथवा संघटना यांच्याविरुध्द संबंधित पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी यांनी कारवाई करावी, असे जिल्हाधिकारी शंभरकर यांनी आदेशात नमूद केले आहे.
या आदेशाचे चांगल्या उद्देशाने अंमलबजावणी करण्याच्या इराद्याने केलेल्या किंवा करण्याचे ठरविलेल्या बाबी संबंधाने अशा व्यक्ती विरुध्द कोणतीाही दावा अथवा न्यायीक कार्यवाही करता येणार नाही, असेही आदेशात नमूद आहे.
वरील आदेश हा दिनांक 14.4.2020 रोजीच्या रात्री 24:00 वाजेपर्यंत लागू राहील.