पुणे : मुख्यमंत्री कार्यालयाकडून महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय जाहीर करण्यात आला होता. त्यावर एमपीएससीने संकेतस्थळावर स्वतंत्रपणे परीक्षांचे वेळापत्रक जाहीर केले जाईल, असे जाहीर केले होते. आज अखेर आयोगाने संकेत स्थळावर परीक्षांच्या तारखा जाहीर केल्याची घोषणा केली आहे.
‘एमपीएससी’ ने परीक्षांचे सुधारीत वेळापत्रक जाहीर केल्या नुसार ११ ऑक्टोबर रोजी राज्यसेवा पूर्व परीक्षा तर दुय्यम सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २२ नोव्हेंबर ला होणार आहे. तर महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा पूर्व परीक्षा १ नोव्हेंबर रोजी होणार आहे.
२६ ऑगस्ट रोजी मुख्यमंत्री कार्यालयाने कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाचे कारण देत अचानक परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय ट्विटर वरून जाहीर केला होता. यामुळे विदयार्थ्यांनी आश्चर्य व्यक्त केले होते. आयोगाने असा निर्णय जाहीर करणे अपेक्षित होते. आयोगाच्या अधिकृत संकेतस्थळावर अशी कोणतीही घोषणा जाहीर न झाल्याने परीक्षा खरंच होणार की पुढे जाणार, या बाबत विद्यार्थ्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण होते. अखेर आयोगाने परीक्षांचे वेळापत्रक लवकरच स्वतंत्रपणे जाहीर केलं जाईल. अशी घोषणा केल्याने विद्यार्थ्यांना दिलास मिळाला होता. मात्र आज तारखा जाहीर झाल्याने विद्यार्थी सुखावले आहेत.