- सुमारे रु.४४९ कोटींचे काम
सोलापूर : केंद्र शासनाच्या महत्वकांक्षी योजनेअंतर्गत सोलापूर शहराचा स्मार्ट सिटी योजनेत दि.२८ जानेवारी २०१६ रोजी समावेश झाला. तदनंतर सोलापूर सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लि.या विशेष उद्देश वाहन (SPV) कंपनीची स्थापना दि.२३ मार्च २०१६ रोजी करणेत आली. सोलापूर शहरातील नागरिकांचे मतमतांतरे जाणुन घेत स्मार्ट सिटी अंतर्गत“ स्वच्छ – कार्यक्षम – विकसनशील” हे लक्ष ठेवणेत आलेले आहे.
स्मार्ट सिटी योजनेअंतर्गत आतापर्यंत २१ प्रकल्प पुर्ण करणेत आले असुन १४ प्रकल्प प्रगतीपथावर आहेत. सदर प्रगतीपथावरील कामांपैकी उजनी ते सोलापूर हा शहराच्या भविष्याच्या दृष्टीने महत्वकांक्षी प्रकल्प आहे. सदर कामाचे भुमीपूजन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे हस्ते यापुर्वीच करणेत आलेले आहे.
उजनी ते सोलापूर दुहेरी पाईपलाईन योजना-सन २०३३ ची लोकसंख्या विचारात घेऊन सोलापूर शहरासाठी वाढीव पाणीपुरवठा योजनेसाठी उजनीधरण ते सोलापूर ११० एमएलडी क्षमतेची दुहेरी पाईपलाईन योजना शासनस्तरावर मंजुर झालेली आहे. सदर योजनेच्या अमंलबजावणीनंतर सोलापूर शहरास अधिकचे ११० दशलक्ष लिटर इतके पाणी उपलब्ध होणार आहे. त्याअनुंषंगाने या योजनेचा प्रस्ताव महाराष्ट्र जीवन प्राधिकरण यांचेकडुन तयार करणेत आलेला असुन त्यांचा खर्च सुमारे र.रु.४४९.६४ कोटी इतका आहे. सदरहु योजनेसाठी एनटीपीसी मार्फत र.रु.२५० कोटी इतका निधी मिळणार असुन उर्वरीत र.रु. २०० कोटी इतका निधी स्मार्ट सिटीच्या उपलब्ध निधीतुन खर्च करणेत येणार आहे.
सदर कामाचे र.रु.३५९ कोटी इतक्या रक्कमेचे टेंडर दि.१७ जानेवारी २०१९ रोजी प्रसिध्द करणेत आलेली होती. सदर निविदेच्या सर्व प्रक्रिया पुर्ण करणेत येवुन दि.०९ सप्टेंबर २०१९ रोजी हैदराबाद येथील पोचमपाड कन्स्ट्रक्शन कंपनी प्रा.लि. यांना र.रु.४०५ कोटी(जीएसटी वगळुन ) इतक्या रक्कमेचे कार्यारंभ आदेश देणेत आलेला आहे.सदर कामाची मुदत ३० महिने इतकी आहे. सदर कामांकरीता महाराष्ट्र जीवन प्राधिकरण यांना प्रकल्प व्यवस्थापन सल्लागार ( कामावर देखरेख) म्हणुन नियुक्ती करणेत आलेली आहे.
उजनी ते सोरेगाव पर्यंतच्या पाईपलाईन जमीनीखालुन टाकणेसाठी महाराष्ट्र भुमीगत नळमार्ग व भुमीगत वाहिन्या अधिनियम २०१८ नुसार मार्गक्रमण मिळणेकरीता जिल्हाधिकारी व अधिक्षक भुमी व अभिलेख मार्फत सीमांकन व मोजणीचे कामकाज सुरु आहे. उजनी जलाशय येथे पंपीग स्टेशन करीता ०.२५ हेक्टर जागा मिळणेकामी सोलापूर महानगरपालिकेकडुन प्रधान सचिव, जलसंपदा विभाग, महाराष्ट्र शासन, मुंबई यांना प्रस्ताव सादर केला आहे. तसेच सदर कामाचे हायड्रॉलिक डिझाईन तयार करुन ते आयआयटी मुंबई येथे मंजुरीस्तव सादर करणेत आले आहे.
सदर योजनेअंतर्गत मुख्यत्वे धरण क्षेत्रात जॅकवेल बांधणे, पंपीग स्टेशन व पंपीग मशिनरी, रायझिंग मेन, बी.पी.टी., ग्रॅव्हीटी मेन इ.कामाचा समावेश आहे. उजनी येथे पंपीग स्टेशन, उजनी ते वरवडे (२८.५ किमी दाबनलिका) , वरवडे ते सोरेगाव (८१.५० किमी उतारनलिका) समाविष्ट आहे. सदर कामांमध्ये १३२१मिमी, १२९६मिमी,११६८मिमी व्यासाच्या पाईपचा समावेश आहे. दि.८ सप्टेंबर २०२० पासुन जिंदाल स्टील वर्क्स येथुन ११६८ मिमी व्यास व १०मिमी जाडीच्या एमएस पाईपचा पुरवठा सुरु झालेला आहे. आज सोलापूर शहरातील पुणे हायवेवरील राष्ट्रीय डाळिंब संशोधन केंद्र येथे प्रत्यक्ष पाईपलाईन टाकणेस सुरवात करणेत आली .सध्या जिंदाल कंपनीकडुन ५ ट्रक पाईप जागेवर पोहोच झाले असुन दरमहा २०किमी लांबीच्या पाईपचा पुरवठा करणेचे जिंदाल स्टील कंपनीने मुख्य कार्यकारी अधिकारी, सोलापूर स्मार्ट सिटी यांना आश्वासित केले आहे. व त्यानुसार दैनंदिन देखभालीखाली तयार असलेल्या पाईप वाहतुकीचे काम सुरु आहे. जसजसे खोदाईचे काम प्रगतीपथावर राहील त्याप्रमाणे पाईप उपलब्ध करुन देणेत येत आहेत. सध्या जवळपास १५ किमी लांबीवरील पाईप टाकणेचे काम सुरु झाले आहे. धरण क्षेत्रातील पंपीग स्टेशनचे काम पुढील महिनाभरात सुरु करणेचे नियोजन करणेत आलेले आहे.जलसंपदा विभागाकडुन लवकरच जमीन उपलब्ध होणार आहे. संपुर्ण उजनी समांतर पाईपलाईन चे काम निश्चित करणेत आलेल्या वेळेपुर्वी पुर्ण करणेचे नियोजन स्मार्ट सिटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी त्रिंबक ढेंगळे-पाटील यांनी केले आहे.
उजनी योजनेचे प्रत्यक्ष पाईप टाकणेच्या कामाची पाहणी करणेकरीता सोलापूरचे खासदार डॉ.जयसिध्देश्वर शिवाचार्य महास्वामीजी, महापौर श्रीकांचना यन्नम, उपमहापौर राजेश काळे, मा.आयुक्त, सो.म.पा. श्री.पी.शिवशंकर , सोलापूर स्मार्ट सिटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री.त्रिंबक ढेंगळे-पाटील , मा.सभागृह नेता श्रीनिवास करली, गटनेते आनंद चंदनशिवे, चेतन नरोटे, रियाज खरादी, परिवहन सभापती जय साळुंखे, तसेच नगरसेवक व नगरसेविका बमगोंडे, पुजारी, डाळींब संशोधन केंद्राचे मा.प्रशासकीय अधिकारी रॉय व संचालिका ज्योत्सना शर्मा, स्मार्ट सिटीचे मुख्य तांत्रिक अधिकारी संजय धनशेट्टी, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे कार्यकारी अभियंता भांडेकर, उपअभियंता कोळी, व मक्तेदार पोचमपाड कंपनीचे श्रीनिवास राव तसेच इतर अधिकारी व पदाधिकारी उपस्थित होते.
सदर योजनेचे काम वर्षभर रखडले होते व ते सुरु झालेनंतर मा.खासदार डॉ.जयसिध्देश्वर शिवाचार्य महास्वामीजी यांनी शुभेच्छा दिल्या.महापौर व उपमहापौर यांनी कामाची पाहणी करुन समाधान व्यक्त केले. तसेच उपस्थित चंदनशिवे व नरोटे तसेच सर्व पदाधिकारी यांनी सदर कामांस शुभेच्छा देवुन वेळेत काम पुर्ण होणेबाबत सुचना केल्या.