येस न्युज मराठी नेटवर्क ; लॉकडाउन शिथिलीकरणाच्या चौथ्या टप्प्यात राज्यातील आंतरजिल्हा प्रवासासाठीची ई-पास सक्ती रद्द करण्यात आल्यानंतर आता मध्य रेल्वेनेही राज्यांतर्गत प्रवासी वाहतूक सुरु करण्याला परवानगी दिली आहे. राज्यांतर्गत रेल्वे बुकिंग उद्यापासून (२ सप्टेंबर २०२० पासून) सुरू होत असल्याचे मध्य रेल्वेने जाहीर केलं आहे. यासंदर्भातील एक पत्रक मध्य रेल्वेने जारी केलं आहे.
पॅसेंजर रिझर्व्हेशन सिस्टीम म्हणजेच आरक्षण पद्धतीने २ सप्टेंबरपासून राज्यांतर्गत प्रवासी वाहतूक सुरु होणार असल्याचे रेल्वेने या पत्रकामध्ये स्पष्ट केलं आहे. सर्व प्रवाशांना राज्यांतर्गत प्रवासासाठी २ सप्टेंबरपासून तिकीट बुकींग करता येणार आहे असंही रेल्वेनं म्हटलं आहे. देशभरामध्ये मार्च महिन्यात लॉकडाउन सुरु झाल्यानंतर प्रवासी रेल्वे वाहतुकीवर निर्बंध घालण्यात आले होते. लॉकडाउनदरम्यान परराज्यातील कामगारांसाठी विशेष श्रमिक ट्रेन्स चालवण्यात आल्या. दुसरीकडे मुंबईतील अत्यावश्यक सेवेमध्ये काम करणाऱ्यांसाठी विशेष मर्यादित लोकल गाड्यांची वाहतूक सुरु आहे. मुंबई लोकलबद्दल अद्याप कोणताही निर्णय झालेला नाही. यादरम्यान मध्य रेल्वेने परिपत्रक प्रसिद्ध करत आंतरजिल्हा प्रवासासाठी परवानगी देण्यात आल्याची माहिती दिली आहे.