सोलापूर : आज देश कोरोनासारख्या मोठ्या आजाराशी लढत आहे. त्यामुळे सर्वांनी एकत्र येणे गरजेचे आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही हेच आवाहन केले आहे. मात्र विरोधक त्याचा बाऊ करत आहेत. पालकमंत्री जितेंद्र आव्हाड यांनी पहिल्या दिवशी मोदींबद्दल जे वक्तव्य वापरले आहे ते पूर्णपणे चुकीचे आहे, त्यांनी जनतेला भडकवण्याचे काम करू नये, असा टोला आमदार सुभाष देशमुख यांनी लगावला आहे.
देशात कोरोनासारखी महामारी आल्यामुळे पंतप्रधानांनी 21 दिवसांचा लॉकडाऊन जाहीर केला आहे. त्याबद्दल त्यांनी माफीही मागितली आहे. कोरोना विरोधात सर्वांनी एकत्र येण्याची गरज आहे हीच भावना ठेवून पंतप्रधानांनी रविवारी सर्वांना दिवे लावण्याचे आवाहन केलेले आहे. मात्र विरोधक या गोष्टीचा बाऊ करत आहेत. आज पालकमंत्री जितेंद्र आव्हाड पहिल्यांदाच सोलापुरात आले. पहिल्याच दिवशी त्यांनी बेजबाबदार वक्तव्य केलेले आहे. जर मनात देश प्रेम असेल तर ही भाषा पालकमंत्र्यांना शोभणारी नाही. राष्ट्रवादीचे नेते आमदार रोहित पवार यांनीही मोदी यांच्या या आवाहनाचे स्वागत केलेले आहे, असे असताना आव्हाडांनी विरोध करणे म्हणजे चुकीचे आहे.
आजच्या संकटाच्या काळात सर्वांना एकत्र घेऊन जाण्याची गरज आहे. त्यानंतर आपण राजकिय लढाई लढू आता ही वेळ सर्वांनी एकत्र येऊन कोरोनाला हरवण्याची आहे आहे, असेही सुभाष देशमुख म्हणाले. भाजपचा प्रत्येक नेता आणि कार्यकर्ता देशाच्या सेवेसाठी आणि ज्या लोकांची उपासमार होत आहे ते थांबवण्यासाठी कटिबद्ध असल्याचेही आमदार देशमुख शेवटी म्हणाले.