येस न्युज मराठी नेटवर्क : शॉर्टकट मारले की रात्रीची कामे करावी लागतात. आमच्यावर मात्र तशी वेळ कधी आली नाही. आम्ही दिवसाढवळ्या कामे करतो. हो ना अजितदादा’, असे विधान करत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार टोलेबाजी केली.
आरेच्या जंगलात मेट्रो कारशेडसाठी रातोरात झाडे तोडण्यात आली होती. फडणवीस सरकारच्या काळात हा प्रकार घडला होता. आता उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील सरकारने आरेची जमीन राखीव वन म्हणून जाहीर केली आहे. आरेतील वनसंपदेचं जतन करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. तो सदर्भ देतच मुख्यमंत्री ठाकरे यांनी फडणवीसांना टोला हाणला. आरेतील मेट्रो कारशेड साठी जो खर्च झाला आहे तो वाया जाऊ दिला जाणार नाही, असेही ठाकरे यांनी नमूद केले. त्याचवेळी काम करताना अहंकार असता नये, असा चिमटाही ठाकरे यांनी घेतला. ओरडून बोलल्यामुळे करोना होतो, असे हिमाचल प्रदेशच्या विधानसभा अध्यक्षांनी सांगितलं आहे. पुढच्या अधिवेशनात आपण सगळ्यांनी याचे पालन करू या, असा टोलाही विरोधी बाकांवर कटाक्ष टाकत मुख्यमंत्र्यांनी लगावला.