येस न्युज मराठी नेटवर्क : भारतीय सैन्यदलाचे नवे लष्करप्रमुख मनोज नरवणे यांनी शनिवारी पत्रकारपरिषदेद्वारे माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी सैन्यदलाशी निगडीत असलेल्या विविध मुद्यांवर आपली भूमिका स्पष्ट केली. याच पार्श्वभूमीवर पाकिस्तान व्याप्त काश्मीर (पीओके) संदर्भात बोलताना त्यांनी सांगितले की, संपूर्ण जम्मू-काश्मीर हा भारताचा भाग आहे, असा संसदीय ठराव आहे. जर, संसदेला ते हवं असेल तर तो भाग देखील आपलाच असायला हवा, जेव्हा आम्हाला या संदर्भातील आदेश मिळतील तेव्हा आम्ही योग्य कारवाई करू.
जम्मू-काश्मीरमधील पूंछ सेक्टरमध्ये दोन निशस्त्र नागरिकांवर पाकिस्तानी सैन्याकडून गोळीबार करण्यात आल्याने त्या दोन नागरिकांचा मृत्यू झाला होता. याबद्दल बोलताना लष्करप्रमुख नरवणे यांनी म्हटले की, आम्ही अशाप्रकारे अमानुष कारवाईचा आधार घेत नाही, सैन्य रुपाने आम्ही अशा घटनांना योग्यप्रकारे हाताळू. सियाचीन बद्दल बोलताना त्यांना सांगितले की, सियाचीन आमच्यासाठी अतिशय महत्वपूर्ण आहे, ज्या ठिकाणी एक फॉर्मेशन पश्चिमी आणि उत्तरी मोर्चा सांभाळून आहे. हे धोरणात्मकदृष्ट्या महत्वाचे आहे, या ठिकाणाहूनच काही होऊ शकते, असे देखील नरवणे यांनी यावेळी सांगितले.