- अहिल्यादेवी होळकर विद्यापीठ प्रथम नामविस्तार दिन उत्साहात साजरा
सोलापूर- पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांना सासरे मल्हारराव होळकर यांनी राज्यकारभार चालवण्याची संधी दिली. त्या संधीचे सोने करत अहिल्यादेवी होळकर यांनी 28 वर्षे कुशल प्रशासनाद्वारे आदर्श राज्यकारभार चालवत देशाला सुजलाम-सुफलाम केल्याचे मत मराठा साम्राज्याचे संशोधक रामभाऊ लांडे यांनी व्यक्त केले.
शुक्रवारी, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठामध्ये प्रथम नामविस्तार दिनाचा सोहळा उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी प्रमुख वक्ते म्हणून संशोधक लांडे हे बोलत होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कुलगुरू डॉ. मृणालिनी फडणवीस या होत्या. यावेळी व्यासपीठावर प्रभारी प्र-कुलगुरू डॉ. विकास कदम आणि मनपा गटनेते नगरसेवक चेतन नरोटे यांची प्रमुख उपस्थिती होती. प्रारंभी कार्यक्रमाचे प्रास्ताविक व स्वागत भाषा संकुलाचे प्रभारी संचालक डॉ. प्रभाकर कोळेकर यांनी केले. प्रारंभी मान्यवरांनी अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून त्यांना अभिवादन केले.
संशोधक लांडे म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची स्थापना केली. त्यांची काही स्वप्न अपूर्ण होती, ती पूर्ण करण्याचे काम आणि परकीय आक्रमणांस लढा देण्याचे कार्य पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी केले. अहिल्यादेवी यांच्याकडे व्यवहारचातुर्य याबरोबरच व्यवस्थापनाचे कौशल्य होते. महेश्वर किल्ल्यातून त्यांनी राज्यकारभार चालून गोरगरिबांना, दीनदलितांना न्याय देण्याबरोबरच आपल्या राज्याचे वैभव वाढविण्याचे कार्य केले. लोकांना रोजगार देण्याबरोबरच दुष्काळाच्यावेळी मोठे बंधारे, विहिरींची निर्मिती त्यांनी केली. चरख्याचे कार्यही त्यांच्या काळात सुरू होता. 28 वर्षे आदर्श राज्यकारभार करून त्यांनी जनतेला सुखी ठेवले होते. उदारमतवादी व ममत्वाची भावना असल्यामुळे त्यांचा सर्वत्र आदर व दरारा होता, असेही लांडे यांनी सांगितले.
यावेळी नगरसेवक चेतन नरोटे, करमाळ्याचे प्रा. शिवाजी बंडगर यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. या कार्यक्रमास विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेचे राज्यपाल नियुक्त सदस्य प्रा. महेश माने, अर्जुन सलगर, सुनील बंडगर, शेखर बंगाळे, राधाकृष्ण पाटील यांच्यासह विद्यापीठाचे अधिकारी, पदाधिकारी, कर्मचारी, विद्यार्थी, शिक्षक, विविध संघटनांचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. ममता बोल्ली यांनी केले तर आभार प्रा. तेजस्विनी कांबळे यांनी मानले.
- अहिल्यादेवींचा मोठा पुतळा उभारणार: कुलगुरू
- पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठातर्फे विद्यापीठ कॅम्पसमध्ये अहिल्यादेवींचा मोठा पूर्णाकृती पुतळा उभारण्यासाठी सध्या तज्ञांशी चर्चा व माहिती घेण्याचे कार्य सुरू आहे. अहिल्यादेवींचे कार्य फार मोठे व महान आहे. त्यांच्या आदर्श कार्यांची सर्वांना प्रेरणा मिळावी याकरिता एक चांगला व मोठा पुतळा विद्यापीठात उभा करण्यात येणार आहे. याचबरोबर विद्यापीठात अध्यासन केंद्र सुरू करण्याकरिता राज्य सरकार आणि केंद्र सरकारकडे प्रस्ताव पाठवून पाठपुरावाही सध्या सुरू असल्याची माहिती कुलगुरू डॉ. मृणालिनी फडणवीस यांनी दिली.