सोलापूर विद्यापीठातील कार्यक्रमात ‘जेएनयू’चे डॉ. उमेश कदम यांची अपेक्षा
सोलापूर – मध्ययुगीन इतिहास काळात एक उच्च कोटीच्या प्रशासक राहिलेल्या रणरागिणी, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी लोककल्याणकारी महान कार्य करत आदर्श राज्यकारभार सांभाळला. त्यांची प्रसिद्ध युद्धनीती, आदर्श न्यायदान पद्धत, प्रजेबद्दल राहिलेली आस्था, मंदिरांचा केलेला जीर्णोद्धार त्याचबरोबर त्यांनी केलेल्या महान कार्याचा इतिहास जगासमोर यावा, अशी अपेक्षा जवाहरलाल नेहरू विद्यापीठ, नवी दिल्ली येथील वरिष्ठ इतिहास प्राध्यापक डॉ. उमेश कदम यांनी व्यक्त केली.
शुक्रवारी, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर अध्यासन केंद्राच्यावतीने अहिल्यादेवी होळकर यांच्या 300 व्या जयंतीनिमित्त आयोजित व्याख्यानात डॉ. कदम हे बोलत होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कुलगुरू प्रा. प्रकाश महानवर होते. यावेळी व्यासपीठावर प्र-कुलगुरू प्रा. लक्ष्मीकांत दामा, कुलसचिव योगिनी घारे, विद्यार्थी विकास विभागाचे संचालक डॉ. केदारनाथ काळवणे, राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे संचालक डॉ. राजेंद्र वडजे यांची उपस्थिती होती. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर अध्यासन केंद्राचे संचालक डॉ. प्रभाकर कोळेकर यांनी प्रास्ताविक व स्वागत करत मान्यवरांचा परिचय करून दिला. यावेळी मान्यवरांच्या हस्ते विद्यावार्ता अंकाचे तसेच चिन्मयी मुळे लिखित क्वीन ऑफ इंडोमिटॅबल स्पिरिट या पुस्तकाचे प्रकाशन झाले. त्याचबरोबर यावेळी यूपीएससी परीक्षेत यश संपादन केलेली स्वाती राठोड, जागतिक पातळीवर कराटे स्पर्धेत विशेष प्राविण्य प्राप्त केलेली भुवनेश्वरी जाधव आणि राष्ट्रीय पातळीवर सांस्कृतिक स्पर्धेत यश संपादन केलेली तेजस्विनी केंद्रे या विद्यार्थिनींचा सत्कार करण्यात आला.
डॉ. कदम म्हणाले की, मध्ययुगीन काळात संपूर्ण भारताला एकत्र जोडलेले राज्य हे महाराष्ट्र होते. मराठा साम्राज्याचा इतिहास, होळकरशाही या सर्वांमध्ये पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे कार्य व त्यांनी केलेला संघर्ष वाखाणण्याजोगे आहे. सर्व कल्याणकारी लोकतंत्र जननी होण्याचा मान त्यांना मिळविला. आज पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर अध्यासन केंद्राने त्यांचे कार्य हे संशोधनाच्या माध्यमातून एकत्रित करीत भारताबाहेर जगासमोर नेण्याचा प्रयत्न करण्याची गरज असल्याचे प्रतिपादन त्यांनी यावेळी केले.
कुलगुरू प्रा. महानवर म्हणाले की, आज पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाकडून विविध कार्यक्रम व उपक्रम राबविण्यात येत आहेत. महापुरुषांचा जाज्वल इतिहास व त्यांचे कार्य आजच्या पिढीसमोर आणण्याचा प्रयत्न केला जात आहे. येथील विद्यार्थी आज राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर चमकत आहेत, ही अभिमानाची बाब आहे. यापुढे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे कार्य विद्यापीठाच्या माध्यमातून परदेशात पोहोचण्यासाठी आपण निश्चित प्रयत्न करू. विद्यापीठाची गुणवत्ता सिद्ध करताना ‘क्यू एस’ जागतिक मानांकन मिळवण्यासाठी निश्चित सर्वांच्या सहकार्याने प्रयत्न करणार असल्याची ग्वाही यावेळी त्यांनी दिली. बक्षिसाचे अभिवाचन सहायक कुलसचिव डॉ. शिवाजी शिंदे यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. ज्योती माशाळे व डॉ. तेजस्विनी कांबळे यांनी केले तर आभार डॉ. काळवणे यांनी मानले.