येस न्युज मराठी नेटवर्क: अरुणाचल प्रदेशच्या सीमेजवळ चिनी सैन्याने जमवाजमव सुरु केली आहे. चीनने ही पावलं उचलल्याने भारतीय सैन्य हाय अलर्टवर आहे. चीनने आता अरुणाचल प्रदेशजवळच्या प्रत्यक्ष नियंत्रण रेषेजवळ सैन्याची जमवाजमव सुरु केली आहे. अरुणाचल प्रदेशच्या सीमेलगत असलेल्या टूटिंग, चांग ज आणि फिशटेल २ या भागात चिनी सैन्य मोठ्या प्रमाणावर दिसून येतं आहे. सीमेलगत असलेले हे भाग भारतीय सीमेपासून अवघ्या २० किमी अंतरावर आहेत. चीनचे सैन्य भारतात घुसखोरीचा प्रयत्न करण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर भारतीय लष्कर हाय अलर्टवर आहे. इंडिया टुडेने यासंदर्भातले वृत्त दिले आहे.
चीनने घुसखोरी करण्याचा प्रयत्न केला किंवा कोणतीही कुरापत काढण्याचा प्रयत्न केला तर त्यांना उत्तर देण्यासाठी भारतीय लष्कर पूर्णतः सतर्क आणि सजग आहे. चिनी सैन्याने जमवाजमव सुरु केल्याने भारतीय लष्करही हाय अलर्टवर आहे. तसंच LAC जवळ लष्कराचे सैनिक वाढवण्यात आले आहेत. ज्याप्रमाणे डोकलाम या ठिकाणी चिनी सैन्य तैनात झालं होतं आणि भारत आणि चीन यांच्यात तणाव वाढला होता. अगदी त्याप्रकारे मागील सहा महिन्यांपासून भारत आणि चीन यांच्यातला तणाव वाढलेला आहे. लडाखच्या गलवान खोऱ्यात भारतीय आणि चिनी सैन्यामध्ये जो संघर्ष झाला होता त्यामध्ये २० भारतीय जवान शहीद झाले होते. या घटनेनंतर चीन आणि भारत या दोन्ही देशांचे परस्पर संबंध तणावाचे झाले. हा तणाव अजूनही कायम आहे.