सोलापूरातील वारकरी भवनाचे शनिवारी जगद्गुरूंच्या दिव्य सानिध्यात भूमिपूजन संपन्न

0
24

सोलापूर – ( प्रतिनिधी ) – वारकरी सांप्रदाय भारताची शान आहे. त्यामुळे आमदार विजयकुमार देशमुख यांच्या निधीतून होणारे वारकरी भवन प्रेरणादायी आणि वारकरी सांप्रदायाला दिशा देणारे ठरेल, असे विचार काशीपीठाचे जगद्गुरु १००८ मल्लिकार्जुन शिवाचार्य महास्वामी यांनी मांडले.

सोलापूर शहर उत्तर मतदार संघातील प्रभाग क्रमांक ६ मधील दमानी नगर भागातील गड दर्शन सोसायटीच्या शेजारी असलेल्या सोलापूर महानगरपालिकेच्या दहा हजार स्क्वेअर फुट जागेत साकारणाऱ्या वारकरी भवनाचा भूमिपूजन समारंभ शनिवारी दुपारी जगद्गुरु मल्लिकार्जुन शिवाचार्य महास्वामी यांच्या शुभहस्ते तसेच पंढरपूर विठ्ठल रुक्मिणी मंदिराचे सहअध्यक्ष ह. भ. प. गहिनीनाथ महाराज औसेकर यांच्या अध्यक्षतेखाली तसेच आमदार विजयकुमार देशमुख आणि अखिल भाविक वारकरी मंडळाचे राष्ट्रीय अध्यक्ष ह. भ. प .सुधाकर महाराज इंगळे तसेच ह.भ.प.  भागवत महाराज चवरे यांच्या प्रमुख उपस्थितीत अखिल भाविक वारकरी मंडळाच्यावतीने पार पडला. यावेळी जगद्गुरु मल्लिकार्जुन शिवाचार्य महास्वामी बोलत होते.


आमदार विजयकुमार देशमुख यांनी या वारकरी भवनासाठी १ कोटी १५ लाख रुपयांचा निधी दिला आहे. वर्षभरात हे काम पूर्ण होणार आहे. पंढरीचा वारकरी साक्षात पांडुरंग म्हणून भक्तांच्या सेवेला हजर होतो.आणि  या वारकऱ्यांसाठी सोलापुरात होत असलेले वारकरी भवन सर्वांसाठी निश्चितच प्रेरणादायी ठरणार आहे .आमदार विजयकुमार देशमुख यांनी समस्त वारकऱ्यांना दिलेला शब्द वारकरी भवनच्या माध्यमातून पूर्ण केला आहे. त्यामुळे वारकरी भवन पूर्ण झाल्यानंतर खऱ्या अर्थाने याचे भव्य आणि दिव्य स्वरूप सर्वांसमोर येईल.तीन मजली वारकरी भवन असावे अशी इच्छा व्यक्त करत वारकरी भवन हे भक्ती आणि शक्तीचा अनोखा संगम ठरेल, असेही महास्वामी यावेळी बोलताना म्हणाले.   

आजचा दिवस वारकऱ्यांच्या जीवनात सुवर्णाक्षराने  लिहिण्यासारखा दिवस आहे. वारकरी कधीही कोणतीही अपेक्षा करत नाही. परंतु वारकऱ्यांसाठी देणाऱ्याने तन-मन-धनाने पुढे आले पाहिजे, म्हणून आमदार विजयकुमार देशमुख वारकरी भवनासाठी पुढे सरसावले, आणि त्यांनी सव्वा कोटीचा निधी वारकरी भवनाला दिला, असे गौरवोद्गार पंढरपूर विठ्ठल रुक्मिणी समितीचे सह अध्यक्ष ह. भ. प .गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी काढले.

सुरुवातीपासूनच वारकरी भवन नेमके कसा असावे याबाबत विचार विनिमय करूनच या वारकरी भवनाच्या माध्यमातून वारकऱ्यांसाठी प्रशिक्षण तसेच अन्य उपक्रम राबविण्याचा मानस असल्याचे ह. भ .प. सुधाकर इंगळे महाराज यांनी सांगितले.

स्थायी समितीचे माजी सभापती शिवानंद पाटील यांनीही वारकरी भवनासाठी सर्वतोपरी आणखी सहकार्य करण्याचे अभिवचन दिले.

  या कार्यक्रमास शिवसेनेचे जिल्हाप्रमुख अमोल शिंदे, भाजपचे शहराध्यक्ष नरेंद्र काळे, भाजपा युवा मोर्चाचे शहराध्यक्ष किरण देशमुख,संजय कोळी, ज्योतीराम चांगभले,प्रकाश महाराज बोधले,जगन्नाथ देशमुख महाराज, मोहन शेळके, लहू गायकवाड, रेखाताई गायकवाड ,सुनील खटके,किसन कापसे, बसवेश्वर जाधव, सुरेश पोखरकर, नागेश खरात, शिवदास चटके सर, किरण पवार यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.

अखिल भाविक वारकरी मंडळाचे शहराध्यक्ष संजय पवार यांनी सूत्रसंचालन केले. तर नागनाथ पाटील यांनी आभार मानले.