सोलापुर – कै. शकुंतला अंकुशराव भोसले यांच्या पहिल्या पुण्यस्मरणानिमित्त प्रा. नयना भोसले यांच्या स्मृतिगंधा पुस्तकाचे प्रकाशन पार पडले. तुळजापुरातल्या मसला (खु.) येथे या पुस्तकाचे दिमाखात प्रकाशन आणि लोकार्पण पार पडले. प्रा. नयना भोसले ह्या सोलापुरातील मातोश्री गंगुबाई केकडे ज्युनिअर महाविद्यालयात इंग्रजी विषयाचे अध्यापन करतात. व्यक्तीच्या आयुष्यात आई वडीलांचे काय स्थान असते. तसेच त्यांच्या जाण्यानंतर निर्माण होणार पोकळी याचे भावविश्व या पुस्तकातून रेखाटण्याचे कार्य प्रा. नयना काशिद यांनी केले आहे. यंत्राच्या युगात वावरताना माणसाचे मन देखील यंत्रमय झाले आहे. मानवी संवेदना संपत चालल्या असून आयुष्यात आई-वडीलांचे महत्व कमी होताना पाहायला मिळतेय. त्यामुळे आजच्या तरुण पीढीला भावणारे प्रसंग लिहित पालकांचे महत्व प्रा. नयना काशीद यांनी आपल्या पुस्तकातून मांडले आहे.
या पुस्तक प्रकाशनाला संत रविदास परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष अशोक आगवाणे यांच्या हस्ते या पुस्तकाचे प्रकाशन पार पडले. पारंपारिक पद्धतीने हा कार्यक्रम न होता, आईचे संस्कार पुस्तक रुपाने जींवत ठेवण्याचे प्रयत्न कौतुकास्पद असल्याचे मत यावेळी अशोक आगवाणे यांनी व्यक्त केले. आई-वडीलांच्या संस्काराचा आदर केला तर वृद्धाश्राम हे समाजातून कायमचे नष्ट होतील असे वक्तव्य जिजाऊ ब्रिगेडच्या प्रवक्त्या व कृषी अधिकारी सारिकाताई आंबुरे यांनी केले. या कार्यक्रमास मसला खुर्दच्या सरपंच प्रफुल्लता नरवडे, मनोज ठोबके, डॉ. अंकुशराव भोसले, बाळासाहेब निंबाळकर, प्रगतशील शेतकरी चंद्रकांत नरवडे, नितीन काशीद इत्यादी मान्यवर उपस्थित होते. दरम्यान या कार्य़क्रमाचे सुत्रसंचालन अभिजीत भोसले यांनी केले तर आभार योगीता शिंदे यांनी मानले.