मुंबई: चांगले खाते मिळाले नाही म्हणून नाराज असलेले कॅबिनेट मंत्री, काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार विस्तारानंतरच्या पहिल्याच मंत्रिमंडळ बैठकीला गैरहजर राहिले आहेत. मंत्रिमंडळ विस्तारानंतर कॅबिनेट मंत्रिपद मिळाल्यानंतर अपेक्षित खाते न मिळाल्याने वडेट्टीवार नाराज असल्याच्या बातम्या प्रसिद्ध होत होत्या. या बरोबरच विस्तारानंतरच्या पहिल्या मंत्रिमंडळ बैठकीला गैरहजर राहून वडेट्टीवार आपली नाराजी व्यक्त करतील अशा बातम्याही सकाळपासूनच प्रसिद्ध झाल्या होत्या. वडेट्टीवार गैरहजर राहिल्याने महाविकास आघाडीतील अंतर्गत कलह अधोरेखित झाल्याचेही राजकीय वर्तुळात बोलले जात आहे.
पंतप्रधान मोदी हे ‘हिंदू जीना’; गोगोईंचे टीकास्त्र
विस्तारानंतर इतर मागासप्रवर्ग, शैक्षणिक व सामाजिक मागास प्रवर्ग, विमुक्त जाती, भटक्या जमाती आणि विशेष मागास प्रवर्ग कल्याण, खार जमिनी विकास आणि भूकंप व पुनर्वसन खाते मिळालेले वडेट्टीवार नाराज होते. खातेवाटपानंतर ते प्रतिक्रिया देण्यासही तयार नव्हते. ‘आपणास कुठलीही प्रतिक्रिया द्यायची नाही. जे लिहायचे ते लिहा,’ अशा शब्दांत त्यांनी आपली नाराजी व्यक्त केली होती. त्यावरून त्यांच्या नाराजीची तीव्रता स्पष्ट झाली होती.