बीड : चिमुकल्या मुलींचे इवल्याशा डोळ्यांनी कुतूहलपणे पाळण्यातील रंगीबेरंगी फुग्यांकडे पाहणे, ते धरण्यासाठी हात उंचावणे.. जवळच फेटा बांधून उभ्या असलेल्या आई, आत्यांकडे एक नजर फिरवणे, यासह सोबतीला कानावर पडणाऱ्या बारशाच्या गितांचा मंजूळ आवाज व नातेवाईकांना वाटली जाणारी मिठाई अशा उत्साही वातावरणात एकाचवेळी ८३६ मुलींच्या नामकरणाचा सोहळा बीडमधील कीर्तन महोत्सवात रविवारी रंगला. स्त्री भ्रूण हत्येचा डाग लागलेल्या जिल्ह्यत असे चित्र आशादायी वाटत होते. या अभूतपूर्व नामकरण सोहळ्याने पुन्हा एकदा आंतरराष्ट्रीय स्तरावर नोंद केली आहे.
बीड येथे स्व. झुंबरलाल खटोड सामाजिक प्रतिष्ठानच्या वतीने ३१ डिसेंबरपासून सोळावा राज्यस्तरीय कीर्तन महोत्सव सुरू आहे. अकरा दिवस चालणाऱ्या या महोत्सवात कीर्तनाला विविध उपक्रमांची जोड दिल्याने महोत्सव सामाजिक परिवर्तनाचे केंद्र झाला आहे. रविवारी महोत्सवाच्या विस्तीर्ण सभामंडपात तिरंगी रंगाच्या फुग्यांनी सजवलेल्या पाळण्यातील ८३६ चिमुकल्या मुलींचा सामूहिकरीत्या नामकरण सोहळा करण्यात आला. बीडच्या खासदार डॉ. प्रीतम मुंडे, शल्यचिकित्सक डॉ.अशोक थोरात यांच्यासह प्रतिष्ठानचे गौतम खटोड आणि सुशील खटोड, भरतबुवा रामदासी आदी उपस्थित होते. साडेआठशे मुलींच्या नामकरण सोहळ्याला आल्याने माझे महत्त्व वाढले असल्याने अशा कार्यक्रमाला मुलींची मावशी म्हणून यायला मला आवडेल.
स्त्री जन्माचे इतक्या मोठय़ा प्रमाणात आणि सन्मानाने कुठलेच स्वागत झाले नसेल. अशा कार्यक्रमांनी स्त्री भ्रूण हत्येचा डाग पुसला जाईल आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर मुलीच्या जन्माचे उत्स्फूर्तपणे स्वागत करणारा जिल्हा अशी ओळख होईल, अशी आशा खासदार डॉ. मुंडे यांनी व्यक्त केली.
मागच्या वेळी याच मंडपात ३०१ मुलींच्या नामकरणाचा सोहळा झाला होता. यावेळी बेटी बचाव, बेटी पढाव या राष्ट्रीय उपक्रमांतर्गत तब्बल साडेआठशे मुलींचा एकत्रित नामकरण सोहळा झाल्याने या कार्यक्रमाची वंडर बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नेंद घेण्यात आल्याची माहिती या संस्थेचे समन्वयक डॉ. स्वर्णश्री गुराम यांनी दिली.
मातांचा साडी-चोळी भेट देऊन गौरव
मुलींच्या सामूहिक नामकरण सोहळ्यात सहभागी झालेल्या मातांचे फेटा बांधून स्वागत करण्यात आले आणि साडी-चोळी भेट देऊन सत्कार करण्यात आला. तर चिमुकल्या मुलींनाही पाळणा, ड्रेस, सुकामेवा, खेळणी भेट देण्यात आल्या. यावेळी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अशोक थोरात यांना सेवा गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले, तर मुलींच्या नामकरण सोहळ्याच्या कार्यक्रमामुळे समाधान वाटते. खासदार प्रीतम मुंडे यांनी कीर्तन महोत्सवासाठी पुढच्या वर्षी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना निमंत्रण द्यावे, अशी अपेक्षा गौतम खटोड यांनी व्यक्त केली.