एस न्युज मराठी नेटवर्क : जासत्ताक दिनाच्या संचलनात राज्याच्या चित्ररथाला डावलण्यात आल्यानंतर आता प्रथम पारितोषिक विजेत्या दक्षिण मध्य क्षेत्र सांस्कृतिक केंद्रातर्फे सादर होणाऱ्या उपराजधानीतील पारंपरिक लोकनृत्याला डावलून गुजरातला संधी दिली आहे. विशेष म्हणजे, यावेळी केंद्रातून दोन नृत्याचे प्रस्ताव पाठवले होते. ते नाकारून पश्चिम क्षेत्र सांस्कृतिक केंद्राला संधी देण्यात आल्याचे समोर आले आहे.
प्रजासत्ताक दिनी दरवर्षी दिल्लीच्या राजपथावर सादर करण्यात येत असलेले नागपूरच्या कलावंतांचे लोकनृत्य साऱ्या जगाचे लक्ष वेधून घेते. या पथकाला आठ वेळा प्रथम पारितोषिक तर तीन वर्षे तृतीय व एक वर्ष उत्तेजनार्थ पारितोषिक मिळाले आहे. प्रजासत्ताक दिनाच्या पाच महिने आधी केंद्राच्या सांस्कृतिक मंत्रालयातर्फे प्रत्येक केंद्राला पत्र पाठवण्यात आले. त्यात कुठले नृत्य सादर केले जाणार आहे याबाबतचा प्रस्ताव द्यावा लागतो. त्याप्रमाणे नागपूरला असलेल्या दक्षिण मध्य क्षेत्र सांस्कृतिक केंद्राने छत्तीसगडचे पंथी व महाराष्ट्राचे खडी गंमत हे पारंपरिक लोकनृत्य सादर केले जाणार असल्याचे कळवले होते. त्यादृष्टीने केंद्राने तयारी सुरू केली होती. मात्र यावेळी नागपूरच्या कलापथकाला डावलण्यात आले. दरवर्षी राजपथावर कला सादर करण्याची संधी मिळत असताना यावेळी सत्ता परिवर्तन झाल्याने ही संधी नाकारली काय, असा प्रश्न आता विचारला जात आहे.
आम्ही प्रस्ताव दिला होता. मात्र यावेळी पश्चिम क्षेत्र केंद्राला संधी देण्यात आली. प्रत्येकवर्षी वेगवेगळ्या केंद्राला संधी दिली जाते. – दीपक खिरवडकर, संचालक, दक्षिण मध्य सांस्कृतिक केंद्र.
केंद्राला मिळालेली आजपर्यंतची पारितोषिके
२००० प्रथम क्रमांक सोंगी मुखवटा
२००१ तृतीय क्रमांक बरेडी नृत्य
२००३ तृतीय क्रमांक कोळी नृत्य
२००४ प्रथम क्रमांक बरेली नृत्य
२००५ प्रथम क्रमांक कर्मा नृत्य
२००७ प्रथम क्रमांक गेडी नृत्य
२००८ तृतीय क्रमांक गौरमाडिया नृत्य
२०१५ उत्तेजनार्थ लेझिम नृत्य
२०१६ प्रथम क्रमांक सोंगी मुखवटे
२०१७ उत्तजनार्थ शैला नृत्य
२०१८ प्रथम क्रमांक बरेली नृत्य