नवी दिल्ली : भाजपाचे खासदार मनोज तिवारी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना एक पत्र लिहिलं आहे. यामध्ये त्यांनी बालदिनाची तारीख बदलण्याची मागणी केली आहे. १४ नोव्हेंबर रोजी पंडित जवाहरलाल नेहरू यांचा वाढदिवस हा बालदिन म्हणून साजरा करण्यात येतो. आता त्याऐवजी १६ डिसेंबर हा बालदिन म्हणून साजरा करण्यात यावा अशी मागणी त्यांनी केली आहे.
१४ नोव्हेंबर रोजी बालदिन साजरा केला जातो. त्याऐवजी शीखांचे दहावे गुरू गुरूगोविंद सिंह साहिबदादा फतेहसिंग यांचा शहादत दिवस हा बालदिन म्हणून साजरा करावा, अशी मागणी तिवारी यांनी पत्राद्वारे केली आहे. पंडित जवाहरलाल नेहरू यांचं लहान मुलांवर प्रेम होतं अशी संकल्पना आहे. त्यामुळे त्यांचा वाढदिवस हा बालदिन म्हणून साजरा केला जातो. १९५६ पासून १४ नोव्हेंबर रोजी बालदिन साजरा करण्यात येत आहे.
साहिब श्री गुरूगोविद सिंह जी, शीखांचे साहिबजादा झोरबारसिंग जी आणि साहिबजादा फतेहसिंग जी हे १५०५ मध्ये सरहिंद पंजाब येथे होते. पौष महिन्यातील कडाक्याच्या थंडीत फतेहगड साहिबच्या थंड बुर्जावर त्यांनी धर्म रक्षणासाठी आपलं बलिदान दिलं, असं तिवारी यांनी नमूद केलं. त्यांचं त्याग आणि धैर्य पाहून त्या दिनाला बालदिन साजरा करण्यात यावा अशी मागणी त्यांनी केली आहे.