प्रवाशांची साेय प्रायोगिक तत्त्वावर साेलापूर, पंढरपूर आगारात होणार वापर.
सोलापूर : रेल्वेच्या धर्तीवर राज्य परिवहन महामंडळ प्रवाशांच्या सोयीसाठी व्हीटीएस यंत्रणा कार्यान्वित करणार आहे. प्रायोगिक तत्त्वावर सोलापूर विभागातील सोलापूर व पंढरपूर आगारातील सर्व एसटी गाड्यांना व्हेईकल ट्रॅकिंग सिस्टिम बसविण्यात येणार आहे. त्यामुळे या दोन आगारातील सर्व गाड्यांची सद्य स्थिती प्रवाशांना समजणार आहे. तसेच, संबंधित गाडी कोणत्या बसस्थानकावर किती वाजता येईल, या बाबतची माहितीही मिळणार आहे. एसटीच्या नियंत्रण कक्षमार्फत ही माहिती प्रवाशांपर्यंत पोहोचणार आहे. मोबाइल अॅपवरूनही प्रवाशांना एसटीचे लोकेशन समजणार आहे. नव्या सिस्टिममुळे प्रवाशांची मोठी सोय होणार आहे.
व्हीटीएस यंत्रणा बसवल्यानंतर प्रवाशांना संबंधित एसटी कोणत्या भागातून धावत आहे. तिचे शेवटचे लोकेशन काय होते. संबंधित बस स्थानकावर येण्यास किती वेळ लागणार आहे, याबाबतची सर्व माहिती अद्ययावत पध्दतीने मिळणार आहे. राज्यातील सर्व विभागात ही यंत्रणा टप्प्याटप्प्याने कार्यान्वित करण्यात येणार आहे. पहिल्या टप्प्यात सोलापूर व पंढरपूर अागाराचा समावेश करण्यात आला. त्यानुसार या दोन अागारातील सुमारे अडीचशे गाड्यांना ही यंत्रणा बसविली जाईल. त्यानंतर उर्वरित आगारांच्या गाड्यांचा समावेश केला जाणार आहे. मुंबई, पुणे विभागातील काही गाड्यांना प्राथमिक टप्प्यात ही यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली आहे. या यंत्रणेमुळे गाडीचे सध्याचे ठिकाण तर कळेलच शिवाय चालकांच्या मनमानी कारभाराला चाप बसणार आहे. बस स्थानकावरील चौकशी कक्षात एसटीची चौकशी करणे हा अनुभव अनेक प्रवाशांना मनस्ताप देणारा असतो. त्यामुळे अनेक प्रवासी ताटकळत एसटीची वाट पाहत उभे राहतात. या यंत्रणेमुळे प्रवाशांना चौकशीसाठी कुठे जाण्याची गरज नाही. बसस्थानकावरील डिस्पलेवर याची माहिती मिळेल. शिवाय, तशी उद्घोषणाही होणार आहे. प्रवाशांना मोबाइलवर किंवा बस स्थानकावरील डिस्पले बोर्डवर संबंधित गाडीचे सध्याचे ठिकाण, संबंधित बसस्थानकावर िकती वाजता येईल, गाडी कोणत्या थांब्यावर आहे या बाबतची माहिती मिळणार आहे. अागारात असणार नियंत्रण कक्ष, बस स्थानकावरील डिस्प्लेवर मिळणार प्रवाशांना गाड्यांची माहिती
अशी काम करेल प्रणाली – राज्य परिवहन महामंडळाच्या मुख्यालयाकडून काही दिवसांपूर्वी राज्यातील सर्व विभागांना या संबंधीचे आदेश देण्यात आले. विभागातील सर्व आगारातील डेपो, बसस्थानक , गाड्यांचे रोड मॅपिंग करून तत्काळ त्या संबंधितीचा डेटा गोळा करा, असे सांगण्यात आले. त्यानुसार सर्व विभागांनी आपापल्या विभागातील रोड मॅपचा डेटा गाेळा केला. – जमा झालेला डेटा नियंत्रण कक्षातील संगणकात फिड करण्यात येईल. याच्याद्वारे आगार व्यवस्थापकांना व बस स्थानकावरील यंत्रणेला या बाबतची माहिती मिळेल.
सुमारे अडीचशे गाड्यांना व्हीटीएस प्रणाली बसविली जाणार व्हीटीएस ही प्रणाली सोलापूर विभागातील सोलापूर व पंढरपूर या दोन आगारात राबविली जाणार आहे. सुमारे अडीचशे गाड्यांना ही प्रणाली बसविली जाईल. नंतर सर्व गाड्यांना ही यंत्रणा बसविण्यात येणार आहे. विलास राठोड, विभागीय वाहतूक अधिकारी, सोलापूर.
याचे फायदे काय १.व्हीटीएस प्रणालीमुळे प्रवासी व एसटी अधिकाऱ्यांना एसटीची सद्य स्थिती समजेल. २. जीपीएस यंत्रणेद्वारे ही यंत्रणा हाताळली जाणार आहे. त्यामुळे चालकाने नेहमीच्या मार्गाने न जाता दुसऱ्या मार्गाने एसटी नेली तर त्याची माहिती नियंत्रण कक्षाला मिळेल. तसेच, चालक निर्धारित गतीपेक्षा अधिक गतीने वाहन चालवित असेल तर त्याचीही माहिती मिळेल. ३. प्रवाशांना घरी बसून मोबाइल अॅपवर एसटीची माहिती मिळणार आहे.