येस न्युज मराठी नेटवर्क : इस्त्रो २०२० मध्ये गगनयान आणि चांद्रयान-३ मोहीम लॉन्च करणार आहे. इस्रोचे प्रमुख के सिवन यांनी नववर्षाच्या सुरुवातीलाच देशवासियांना आनंदाची बातमी दिली आहे. पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी इस्रोची पुढील मोहीम आणि योजनांची माहिती दिली. चांद्रयान-३ मोहिमेसाठी केंद्र सरकारची परवानगी मिळाली असल्याचं के सिवन यांनी सांगितलं आहे. तसंच गगनयान मोहिमेसाठी चार अंतराळवीरांची निवड करण्यात आली असल्याचंही ते म्हणाले आहेत. अवकाश विज्ञानाच्या सहाय्याने आम्ही देशवासियांचं जीवनमान अजून चांगलं करण्याचा प्रयत्न करत असल्याचं यावेळी त्यांनी म्हटलं
२०२० मध्ये आम्ही चांद्रयान-३ लॉन्च करणार आहोत. गगनयानच्या अंतराळवीरांना जानेवारीच्या महिन्याच्या तिसऱ्या महिन्यापासून प्रशिक्षण देण्यास सुरुवात केली जाणार आहे. गगनयान मोहिमेसाठी चार अंतराळवीरांची निवड करण्यात आली आहे. यासाठी राष्ट्रीय स्तरावर सल्ला समितीचं गठन करण्यात आलं आहे. २०१९ मध्ये गगनयान मोहिमेत आम्ही चांगली प्रगती केली आहे,” अशी माहिती के सिवन यांनी दिली आहे.चांद्रयान-३ बद्दल बोलताना के सिवन यांनी माहिती दिली की, “चांद्रयान-३ मोहीम याचवर्षी लॉन्च केली जाणार आहे. यासाठी केंद्र सरकारची परवानगी मिळाली आहे. चांद्रयान-३ मोहीमेत आणि चांद्रयान-२ मध्ये बरंच साम्य आहे. मोहिमेवर काम सुरु झालं आहे. याचं कॉन्फिगरेशन चांद्रयान-२ प्रमाणेच असेल. यातही लँडर आणि रोव्हर असणार आहे”.
भारताच्या चांद्रयान-२ मोहिमेची फक्त भारतात नाही तर जगभरात चर्चा झाली होती. जगाने भारताच्या या ऐतिहासिक मोहिमेची दखल घेतली होती. भारतासाठी अत्यंत महत्त्वाची असलेली चांद्रयान-२ मोहीम अखेरच्या टप्प्यात अपयशी ठरली होती. चंद्रापासून २.१ कि.मी. उंचीवर असतानाच अखेरच्या टप्प्यात अचानक ‘विक्रम लँडर’चा नियंत्रण कक्षाशी संपर्क तुटला होता. यासंबंधी बोलताना के सिवन यांनी सांगितलं की, “आम्ही यशस्वीपणे लँडिंग करु शकलो नसतो तरी ऑर्बिटर अद्यापही काम करत आहे. पुढील सात वर्ष हा ऑर्बिटर सक्रिय राहणार असून यामधून वैज्ञानिकांसाठी महत्त्वाची माहिती उपलब्ध होईल”.