५…४…३…२…१…घड्याळाचा काटा १२ वर आला आणि हॅप्पी न्यू इयर!!! म्हणत सर्वांनी जल्लोषात नवीन वर्ष २०२० चे स्वागत केले. मुंबईकरांचा उत्साह नववर्षाच्या स्वागतासाठी नेहमीप्रमाणे टीपेला गेला होता. चौपाट्यांवर, हॉटेल, रिसॉर्टमध्ये तसेच गच्चीवर धम्माल पार्ट्या करत मुंबईसह देशभरात सर्वांनी सरत्या वर्षाचा निरोप घेतला आणि नवीन वर्षाचं स्वागत केलं.
२०१९ या वर्षातील कडू-गोड आठवणींना उजाळा देत प्रत्येकजण सरत्या वर्षाकडे मोठ्या अपेक्षेने आणि नव्या उत्साहाने पाहत आहे. पुढील वर्ष २०२० असा एकदम क्रिकेटसारखा आकडा घेऊन येत असल्याने त्यावर आधारित मीम्सनादेखील उधाण आले होते. व्हॉट्सअॅपवर तर पूर्वसंध्येपासूनच मेसेजना उधाण आले होते. मुंबईतल्या समुद्रकिनाऱ्यांवर मंगळवारी सायंकाळी या वर्षातला अखेरचा सूर्य पाहण्यासाठीही गर्दी जमली होती. हाच उत्साह मध्यरात्रीपर्यंत कायम होता.