सोलापूर : प्रेमप्रकरणातून फुटबॉलपटू आणि प्रशिक्षक असलेल्या तरुणाची हत्या करण्यात आलीय. प्रदीप विजय अलाट असे 25 वर्षीय मृत तरुणाचे नाव आहे. प्रेमप्रकरणातून प्रदीप यास बेदम मारहाण केल्याने त्याचा मृत्यू झाल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे. या प्रकरणी राष्ट्रवादीचे नगरसेवक असलेले नागेश गायकवाड यांचे पुत्र चेतन गायकवाड याच्यासह 5-6 साथीदार मित्रांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मृत तरुण हा उत्कृष्ट फुटबॉलपटू होता. सोबतच विविध शाळांमध्ये क्रीडा प्रक्षिशक म्हणूनही काम पाहत होता. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर विद्यापीठात सुरू असलेल्या क्रीडा स्पर्धेसाठी स्वयंसेवक म्हणून जाण्यासाठी तो घरातून बाहेर पडला होता. दुपारी अचानक त्याला फोन आल्याने तो मैदानातून निघून गेला. थोड्या वेळात एका ठिकाणी त्याची भांडणे झाल्याचा फोन त्याने मित्राला केला. मित्र घटनास्थळी पोहोचल्यानंतर त्यांना प्रदिप तिथं दिसला नाही. संध्याकाळच्या सुमारास सोलापुरातल्या मोदी परिसरातील गंगामाई रुग्णालयात गंभीर जखमी अवस्थेत अज्ञात व्यक्तींनी प्रदीपला दाखल करत पळ काढला. उपचारापुर्वीच प्रदीप याचा मृत्यू झाल्याची माहिती डॉक्टरांनी दिली. दरम्यान आरोपी चेतन गायकवाडसह त्याचे मित्र फरार असून पोलिस त्यांचा शोध घेत आहेत.
प्रेमसंबंधातून हत्या झाल्याचा आरोप –
आरोपी चेतन गायकवाड आणि त्याच्या साथीदाराने प्रदिपला मारहाण केल्याचे फिर्यादीमध्ये म्हटले आहे. यातील एका आरोपीच्या बहिणीचे मृत प्रदिपसोबत प्रेमसंबंध असल्याने मारहाण करण्यात आल्याचा आरोपही मित्रांनी केला आहे. दरम्यान, मृत प्रदिपची कोणाशीही भांडणे नव्हती, तो त्याच्या कामावर नियमित जायचा, अशी माहिती कुटुंबीयांनी दिली आहे.
राष्ट्रवादीच्या नगरसेवकाच्या पुत्राविरोधात गुन्हा –
फुटबॉलपटू आणि प्रशिक्षक असलेल्या तरुणाची हत्या प्रकरणी राष्ट्रवादीचे नगरसेवक असलेले नागेश गायकवाड यांचे पुत्र चेतन गायकवाड याच्यासह 5-6 साथीदार मित्रांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे या प्रकरणाची चर्चा सध्या जिल्ह्याभर पसरली आहे. तर, यात आरोपींना वाचवण्याचाही प्रयत्न केला जाऊ शकतो, अशाही चर्चाही आता सोलापुरात होऊ लागल्या आहेत. त्यामुळे पोलीसांच्या तपासाकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.