– राज्य सरकारचे केंद्राकडे साकडे
– जीएसटी परिषदेच्या बैठकीत अर्थमंत्री जयंत पाटील यांची मागणी
नवी दिल्ली : नैसर्गिक आपत्तीत सापडलेल्या महाराष्ट्रातील शेतकर्यांना मदत देण्यासाठी १४ हजार कोटी रुपयांचा निधी द्यावा, अशी मागणी राज्य सरकारच्यावतीने अर्थमंत्री जयंत पाटील यांनी बुधवारी केंद्राकडे केली. पाटील हे वस्तू व सेवा कर (जीएसटी) परिषदेच्या बैठकीला हजर होते. याप्रसंगी त्यांनी ही मागणी केली. याबाबतची माहिती त्यांनी ट्वीटरद्वारे दिली आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारमन यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक पार पडली.
राज्याचे अर्थमंत्री जयंत पाटील यांनी ट्वीटरवर नमूद केले, की आज दिल्लीत जीएसटी परिषदेला हजर होतो. केंद्र सरकारने राज्यातील नैसर्गिक आपत्तीने नुकसान झालेल्या शेतकर्यांना मदतीच्या दृष्टीकोनातून तातडीने १४ हजार कोटी रुपयांचा निधी द्यावा. तसेच, राज्यातील जीएसटी भरणार्या करदात्यांसाठी यावेळी अनेक सूचनाही मांडल्यात, असेही त्यांनी नमूद केले.
नैसर्गिक आपत्तीने झालेल्या नुकसानीचा उल्लेख जयंत पाटील यांनी केला असला तरी, नेमक्या कोणत्या नुकसानीसाठी त्यांनी ही मदत मागितली, हे स्पष्ट होऊ शकले नाही. पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर, सातारा व सांगली या तीन जिल्ह्यांत जुलै-ऑगस्टमध्ये आलेल्या महापुराने मोठे नुकसान झाले होते. त्यात २९ जणांचा बळी गेला होता. तसेच, शेतीपिकांचीही मोठी हानी झाली होती. तसेच, ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये आलेल्या अतिवृष्टी व महापुरामुळे मोठी पीकहानी झाली होती. या नुकसानीकडे पाटील यांनी केंद्र सरकारचे लक्ष वेधले असावे, असे सांगण्यात आले. नोव्हेंबर २०१९च्या तिमाहीचे केंद्र सरकारकडे महाराष्ट्राचा तब्बल १५ हजार ५५८ कोटी रुपयांचा जीएसटी परतावा बाकी असून, या पैशाची मागणीही पाटील यांनी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमन यांच्याकडे केली. यापूर्वी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही केंद्राला पत्र लिहून हा पैसा देण्याची मागणी केली होती. त्यानंतर केंद्राने जीएसटी परताव्याची काही रक्कम राज्याला पाठवली होती.